
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा व काजू उत्पादकांसाठी क्रांतिकारी पाऊल, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित ‘स्मार्ट’ शेती प्रकल्प राबविणार
गेल्या काही वर्षांत हवामान बदल, अवकाळी पाऊस आणि वाढत्या कीड-रोगांमुळे जिल्ह्यातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितेश राणे यांनी वेळोवेळी बैठका घेऊन आढावा घेतला.
बागायतदारांचे उत्पादन व उत्पन्न वाढवण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा आणि काजू उत्पादकांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित ‘स्मार्ट’ शेती प्रायोगिक प्रकल्प राबविण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या नियोजनातून तसेच डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांच्या समन्वयातून कृषी विभाग सिंधुदुर्ग मार्फत राबवल्या जाणाऱ्या या प्रायोगिक प्रकल्पाद्वारे जिल्ह्यातील शेती क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली जाणार आहे.
हवामान बदलामुळे होणाऱ्या नुकसानीवर मात करण्यासाठी हे तंत्रज्ञान क्रांतीकारी ठरेल. हा प्रायोगिक प्रकल्प यशस्वी झाल्यास संपूर्ण कोकणातील फलोत्पादनासाठी हे एक आदर्श ‘स्मार्ट शेती’ मॉडेल ठरेल, असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे.
प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट व स्वरूप –
आधुनिक AI तंत्रज्ञानाचा वापर करून कीड-रोगांचे वेळेवर निदान करणे आणि हवामानाचा अचूक अंदाज देणे हे या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट आहे. हा प्रकल्प जिल्ह्यातील सर्व ८ तालुक्यांमध्ये क्लस्टर पद्धतीने राबवला जाईल. यामध्ये एकूण ४०० शेतकऱ्यांची (२०० आंबा व २०० काजू उत्पादक) क्लस्टर पद्धतीने निवड करण्यात येत आहे.

