एच.डी.एफ.सी. परिवर्तन कप क्रिकेट स्पर्धेत अचिव्हर्स क्रिकेट अकादमी अजिंक्य; अनिश विद्युत ठरला सर्वोत्तम खेळाडू
एच.डी.एफ.सी. परिवर्तन कप क्रिकेट स्पर्धेत अचिव्हर्स क्रिकेट अकादमी अजिंक्य; अनिश विद्युत ठरला सर्वोत्तम खेळाडू
फोटो- दिलीप वेंगसरकर फौंडेशनच्या वतीने ओव्हल मैदान, चर्चगेट येथे आयोजित करण्यात आलेल्या १२ वर्षाखालील मुलांच्या एच. डी. एफ. सी. परिवर्तन कप क्रिकेट स्पर्धेत विजेता ठरलेल्या अचिव्हर्स क्रिकेट अकादमी संघाचे छायाचित्र. सोबत भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर, मुंबईच्या १४ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट निवड समितीचे चेअरमन अझीम खान, याच निवड समितीचे सदस्य जयदीप पाल, अमित जाधव देखील दिसत आहेत.
मुंबई : ( विजय बने )
दिलीप वेंगसरकर फाउंडेशनच्या वतीने ओव्हल मैदान, चर्चगेट येथे आयोजित करण्यात आलेल्या १२ वर्षांखालील मुलांच्या एच.डी.एफ.सी. परिवर्तन कप क्रिकेट स्पर्धेत अचिव्हर्स क्रिकेट अकादमी संघाने विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात अचिव्हर्स अकादमीने यंग बॉईज क्रिकेट क्लब संघाचा तब्बल ११६ धावांनी पराभव करत दणदणीत विजय मिळवला. या स्पर्धेत अनिश विद्युत याने अष्टपैलू कामगिरी करत स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू आणि सर्वोत्तम फलंदाजाचा मान मिळवला.
प्रथम फलंदाजी करताना अचिव्हर्स क्रिकेट अकादमीने निर्धारित ३५ षटकांत ४ बाद २३० धावांची भक्कम मजल मारली. अनिश विद्युत (५४) आणि रिदम कचरे (५१) यांनी पहिल्या विकेटसाठी ११५ धावांची शानदार सलामी दिली. त्यानंतर शौर्य पाटील (२६), युवराज घरत (४०) आणि शाल्व महरजन (नाबाद ३०) यांनी उपयुक्त योगदान देत संघाची धावसंख्या २३० पर्यंत पोहोचवली. यंग बॉईजच्या रुद्राक्ष गवस (३२ धावांत २ बळी) आणि कबीर सूपल (४१ धावांत २ बळी) यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.
२३१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना यंग बॉईज क्रिकेट क्लबचा संपूर्ण संघ ३३.१ षटकांत ११४ धावांवर बाद झाला. अचिव्हर्सच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच अचूक मारा करत प्रतिस्पर्धी संघाला मोठी धावसंख्या उभारण्याची संधी दिली नाही. दिशांक मेहता याने २२ धावांत ४ बळी, शाल्व महरजन याने १६ धावांत ३ बळी, तर श्रीयांश तिवारी याने अवघ्या २ धावांत २ बळी घेत विजयात मोलाचा वाटा उचलला. यंग बॉईजकडून भूमिराज मढवी याने सर्वाधिक २५ धावा केल्या.
अंतिम सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून शाल्व महरजन याची निवड करण्यात आली. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू आणि सर्वोत्तम फलंदाज हे दोन्ही पुरस्कार अचिव्हर्स क्रिकेट अकादमीच्या अनिश विद्युत याने पटकावले. त्याने संपूर्ण स्पर्धेत २३५ धावा करण्यासोबतच ६ बळीही मिळवले. सर्वोत्तम गोलंदाज म्हणून यंग बॉईज क्रिकेट क्लबच्या हर्षित कदम (११ बळी), तर सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून विहान जैस्वाल (८ झेल) याला गौरविण्यात आले.
मुंबईच्या १४ वर्षांखालील क्रिकेट निवड समितीचे अध्यक्ष अझीम खान, निवड समितीचे सदस्य जयदीप पाल आणि भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांच्या हस्ते विजेत्या तसेच वैयक्तिक पुरस्कार विजेत्या खेळाडूंना गौरविण्यात आले.
संक्षिप्त धावफलक :
अचिव्हर्स क्रिकेट अकादमी : ३५ षटकांत ४ बाद २३० (अनिश विद्युत ५४, रिदम कचरे ५१, शौर्य पाटील २६, युवराज घरत ४०, शाल्व महरजन नाबाद ३०; रुद्राक्ष गवस २/३२, कबीर सूपल २/४१).