तारळी पंप्ड स्टोरेज प्रकल्पाच्या कामाला वनविभागाचा दणका! NBWL परवानगीशिवाय काम सुरू केल्याचा ठपका; तात्काळ काम थांबविण्याची नोटीस

0
11
तारळी पंप्ड स्टोरेज प्रकल्प तात्काळ काम थांबविण्याची नोटीस
तारळी पंप्ड स्टोरेज प्रकल्प तात्काळ काम थांबविण्याची नोटीस

तारळी पंप्ड स्टोरेज प्रकल्पाच्या कामाला वनविभागाचा दणका! NBWL परवानगीशिवाय काम सुरू केल्याचा ठपका; तात्काळ काम थांबविण्याची नोटीस

पाटण :
सातारा जिल्ह्यातील पाटण वनपरिक्षेत्रातील मौजे तारळे परिसरात सुरू असलेल्या तारळी पंप्ड स्टोरेज प्रोजेक्टच्या (Tarali PSP) कामावर वनविभागाने गंभीर आक्षेप घेतला आहे. राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची (National Board for Wildlife – NBWL) आवश्यक पूर्वपरवानगी प्राप्त नसतानाही प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आल्याचे प्राथमिक तपासणीत निदर्शनास आल्याचे नमूद करत पाटणचे वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) आर. एस. नलवडे यांनी १३ नोव्हेंबर २०२६ रोजी अदानी प्रकल्पाच्या अधिकृत स्वाक्षरीकर्त्यांना नोटीस बजावली आहे. या नोटिशीद्वारे प्रकल्पस्थळी सुरू असलेली सर्व प्रकारची कामे तात्काळ थांबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
वनविभागाच्या नोटिशीनुसार, तारळे पंप्ड स्टोरेज प्रोजेक्टचे काम सुरू असल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर करण्यात आलेल्या प्राथमिक तपासणीत या प्रकल्पासाठी आवश्यक असलेली राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची पूर्वपरवानगी प्राप्त नसल्याचे आढळून आले आहे. असे असतानाही प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम सुरू करण्यात आल्याचे नोटिशीत म्हटले आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर असून, प्रचलित वन व वन्यजीव कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करणारा असल्याचे वनविभागाने नमूद केले आहे.
या पार्श्वभूमीवर वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी प्रकल्प व्यवस्थापनाला पहिला आदेश देताना, सक्षम प्राधिकरणाच्या तसेच राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या रीतसर पूर्वपरवानग्या प्राप्त होईपर्यंत तारळी पंप्ड स्टोरेज प्रकल्पाच्या ठिकाणी सुरू असलेली सर्व प्रकारची कामे तात्काळ थांबविण्याचे निर्देश दिले आहेत. आवश्यक परवानग्या मिळाल्याशिवाय पुढील काम सुरू ठेवू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
दुसऱ्या आदेशानुसार, राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची वैध पूर्वपरवानगी नसताना प्रकल्पाचे काम कोणत्या अधिकारात आणि कोणत्या आधारावर सुरू करण्यात आले, याचा सविस्तर व लेखी खुलासा करण्यास सांगण्यात आले आहे. ही नोटीस प्राप्त झाल्यापासून तीन दिवसांच्या आत संबंधित खुलासा पाटण वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
तिसऱ्या महत्त्वाच्या मुद्द्यात प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रात वृक्षतोड करण्यासाठी सक्षम प्राधिकरणाची रीतसर परवानगी घेण्यात आली आहे किंवा नाही, याबाबत माहिती मागविण्यात आली आहे. वृक्षतोडीची परवानगी घेतली असल्यास एकूण किती झाडे तोडण्यास मंजुरी मिळाली आहे, याचा तपशील देण्याचे निर्देश आहेत. तसेच वृक्षतोडीच्या परवानगीचे मूळ किंवा साक्षांकित पत्र, प्रकल्पाशी संबंधित इतर सर्व वैधानिक मंजुरींची कागदपत्रे आणि नकाशे विहित मुदतीत वनविभागाच्या कार्यालयात सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
वनविभागाने या नोटिशीमध्ये वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ आणि महाराष्ट्र वृक्षतोड (नियमन) अधिनियम, १९६४ मधील तरतुदींचा संदर्भ दिला आहे. निर्धारित तीन दिवसांच्या मुदतीत समाधानकारक खुलासा आणि आवश्यक परवानग्यांची कागदपत्रे सादर न केल्यास, तसेच काम सुरू ठेवल्याचे आढळल्यास वन कायद्यानुसार संबंधितांविरुद्ध कठोर कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे.
ही नोटीस पाटण येथील वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) आर. एस. नलवडे यांनी जारी केली असून, तिच्या प्रती सातारा वनविभागातील उपवनसंरक्षक तसेच सहाय्यक वनसंरक्षक (वनी व कॅम्पा), सातारा यांना माहितीसाठी पाठविण्यात आल्या आहेत.
तारळी पंप्ड स्टोरेज प्रकल्पाच्या कामासंदर्भात वन्यजीव मंडळाची पूर्वपरवानगी, वृक्षतोडीची मंजुरी आणि अन्य वैधानिक परवानग्यांचा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे. वनविभागाच्या या नोटिशीनंतर प्रकल्प व्यवस्थापनाकडून कोणता खुलासा सादर केला जातो आणि पुढील कार्यवाही काय होते, याकडे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here