एमपीएससी परीक्षा पद्धतीबाबत शिक्षक-विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

0
26
एमपीएससी परीक्षा पद्धतीबाबत शिक्षक-विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
एमपीएससी परीक्षा पद्धतीबाबत शिक्षक-विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

एमपीएससी परीक्षा पद्धतीबाबत शिक्षक-विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

मुंबई :
एमपीएससी परीक्षेच्या पद्धतीसंदर्भातील विविध मागण्यांसाठी स्पर्धा परीक्षा शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेतली. यावेळी शिक्षक सचिन ढवळे, यशवंत सोलाट, धनंजय मते, गणेश कड, उमेश कुदळे, विद्यार्थी चळवळीतील कार्यकर्ते निखिल पाटील यांच्यासह स्पर्धा परीक्षा शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुदृढ करण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. परीक्षा प्रक्रियेत आवश्यक सुधारणा करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरावर उच्चस्तरीय समिती गठित करण्यात आली आहे.
या समितीत यूपीएससीचे माजी सदस्य, पोलिस महासंचालक, आयआयटीचे प्राध्यापक तसेच अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. समितीचा शासन आदेशही निर्गमित करण्यात आला असून, समिती राज्यातील विविध विभागांमध्ये जाऊन विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि संबंधित घटकांशी सल्लामसलत करणार आहे. पुण्यातही समिती भेट देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
दरम्यान, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी शासनाने काही कठोर कायदेही केले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. औषध निरीक्षक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली असून, पोलिसांकडून गतिमान तपास सुरू आहे. या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली आहे. गैरप्रकारात आयोगातील किंवा आयोगाबाहेरील कोणत्याही व्यक्तीचा सहभाग आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
स्पर्धा परीक्षांसाठी प्रामाणिकपणे मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कष्टांचे चीज होईल, अशाच पद्धतीने परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्यात येतील. विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही. विद्यार्थ्यांच्या मनातील संभ्रम दूर करून परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास कायम ठेवण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
प्रश्नपत्रिका निर्मितीपासून परीक्षा प्रक्रियेपर्यंत आवश्यक त्या सुधारणा सर्व घटकांना विश्वासात घेऊन तातडीने अंमलात आणल्या जातील, असे आश्वासनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिष्टमंडळाला दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here