ऐरोलीत 45% तर बेलापूरमध्ये 52% गणनाप्रपत्रे जमा

0
9
ऐरोलीत 45% तर बेलापूरमध्ये 52% गणनाप्रपत्रे जमा
ऐरोलीत 45% तर बेलापूरमध्ये 52% गणनाप्रपत्रे जमा

ऐरोलीत 45% तर बेलापूरमध्ये 52% गणनाप्रपत्रे जमा

17 ऑगस्टपूर्वी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

नवी मुंबई | प्रतिनिधी
नवी मुंबईतील 150 ऐरोली आणि 151 बेलापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदार गणनाप्रपत्र (Enumeration Form) संकलन आणि डिजिटलायझेशन प्रक्रियेला वेग आला असून मोठ्या प्रमाणावर मतदारांनी आपली गणनाप्रपत्रे भरून बीएलओंकडे जमा केली आहेत.
अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा नवी मुंबई महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, 150 ऐरोली विधानसभा मतदारसंघातील 4 लाख 97 हजार 380 मतदारांपैकी 4 लाख 59 हजार 153 गणनाप्रपत्रांचे वितरण करण्यात आले आहे. त्यापैकी 2 लाख 23 हजार 808 म्हणजेच 45 टक्के गणनाप्रपत्रे मतदारांकडून माहिती भरून बीएलओंकडे जमा झाली असून त्यांचे डिजिटलायझेशन पूर्ण करण्यात आले आहे.
तसेच 151 बेलापूर विधानसभा मतदारसंघातील 4 लाख 22 हजार 317 मतदारांपैकी 4 लाख 10 हजार 863 गणनाप्रपत्रांचे वितरण झाले आहे. त्यापैकी 2 लाख 18 हजार 28 म्हणजेच 52 टक्के गणनाप्रपत्रे मतदारांकडून भरून जमा करण्यात आली असून त्यांचे डिजिटलायझेशनही पूर्ण झाले आहे.
मतदारांच्या सोयीसाठी संबंधित मतदान भाग क्रमांकानुसार बीएलओंची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी आपल्या भागातील बीएलओशी संपर्क साधून गणनाप्रपत्र भरावे आणि त्याचे डिजिटलायझेशन पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मतदानाचा घटनादत्त अधिकार अबाधित राखण्यासाठी गणनाप्रपत्र भरणे आणि ते बीएलओंकडे वेळेत जमा करणे आवश्यक आहे. त्यामुळे 17 ऑगस्टची अंतिम मुदत न गाठता नागरिकांनी आजच आपले गणनाप्रपत्र दाखल करावे, असे आवाहन अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी सुनील पवार यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here