‘स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे स्मृती सन्मान २०२६’ सोहळ्यात कलावंतांचा गौरव

0
12
‘स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे स्मृती सन्मान २०२६’ सोहळ्यात कलावंतांचा गौरव
‘स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे स्मृती सन्मान २०२६’ सोहळ्यात कलावंतांचा गौरव

‘स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे स्मृती सन्मान २०२६’ सोहळ्यात कलावंतांचा गौरव

प्रल्हाद शिंदे यांचे योगदान अजरामर – उदय सामंत

मुंबई | प्रतिनिधी
‘स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे स्मृती सन्मान २०२६’ या पुरस्कार सोहळ्यात मराठी संगीत, लोककला आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी महाराष्ट्राचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या योगदानाला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा अमूल्य ठेवा असल्याचे म्हटले.

मंत्री सामंत म्हणाले की, सत्यनारायणाची पूजा असो किंवा पंढरपूरची वारी, महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात आणि भाविकांच्या ओठांवर आजही प्रल्हाद शिंदे यांची भक्तिगीते श्रद्धेने गुंजत असतात. त्यांच्या गीतांनी भक्ती, संस्कार आणि समतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचवला असून त्यांचे योगदान अजरामर आहे.
यावेळी बोलताना त्यांनी प्रल्हाद शिंदे यांच्या गायकीच्या वैशिष्ट्यांवर प्रकाश टाकत, “जिथे अनेक गायकांचे स्केल संपते, तिथून स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे यांचा स्वर सुरू व्हायचा,” असे गौरवोद्गार काढले. तसेच स्वरसम्राट आनंद शिंदे यांनी ही समृद्ध परंपरा समर्थपणे पुढे नेल्याचे सांगत, ‘स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे स्मृती सन्मान’ हा केवळ पुरस्कार नसून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा सन्मान असल्याचे नमूद केले.
सामंत यांनी आनंद शिंदे आणि शिंदे कुटुंबाशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याचाही उल्लेख केला. मोठे यश मिळवूनही आनंद शिंदे यांनी जपलेला साधेपणा, नम्रता आणि माणुसकीचा वारसा पुढील पिढीसाठी आदर्श असल्याचे त्यांनी सांगितले.

गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित या भव्य संगीतमय सोहळ्यात राज्यभरातील लोककलावंतांचा सहभाग होता. मराठी संगीत, लोककला आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध पुरस्कारार्थींचा गौरव करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) तसेच अभिनेते-दिग्दर्शक प्रवीण तरडे (Pravin Tarde) यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्यासह लोककला, संगीत, चित्रपट आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर तसेच रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here