ऑफ सिझन मध्ये फिटनेस आणि कौशल्य विकासावर लक्ष द्या – वेंगसरकर

0
32
ऑफ सिझन मध्ये फिटनेस आणि कौशल्य विकासावर लक्ष द्या - वेंगसरकर
ऑफ सिझन मध्ये फिटनेस आणि कौशल्य विकासावर लक्ष द्या - वेंगसरकर

ऑफ सिझन मध्ये फिटनेस आणि कौशल्य विकासावर लक्ष द्या – वेंगसरकर

माहुल, चेंबूर येथील वेंगसरकर क्रिकेट अकादमीच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या १२ वर्षाखालील खेळाडूंच्या एच. डी. एफ. सी. बँक परिवर्तन कप क्रिकेट स्पर्धेत अजिंक्य ठरलेल्या जितेंद्र आव्हाड क्रिकेट इन्स्टिटयूट संघाचे छायाचित्र. सोबत भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर,  मुंबई महानगर पालिकेचे माजी डेप्युटी कमिशनर सुधीर नाईक, अकादमीचे प्रशिक्षक अमित जाधव आणि काळे दिसत आहेत.

मुंबई आता ऑफ सिझन मध्ये फिटनेस आणि कौशल्य विकासावर लक्ष द्या असा सल्ला भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी छोट्या खेळाडूंना दिला.  माहुल, चेंबूर येथील वेंगसरकर क्रिकेट अकादमीच्या मैदानावर झालेल्या एच. डी.एफ.सी. बँक परिवर्तन कप या १२ वर्षाखालील खेळाडूंच्या क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. जितेंद्र आव्हाड क्रिकेट इन्स्टिटयूट संघाने अंतिम फेरीत आशीर्वाद क्रिकेट क्लब संघावर ६ विकेट्सनी विजय मिळवत या स्पर्धेचे जेतेपद पटकावले.  दरम्यान वेंगसरकर यांनी दिलीप वेंगसरकर फौंडेशन च्या वतीने मुंबई महानगर पालिकेचे माजी डेप्युटी कमिशनर सुधीर नाईक  यांचा मुंबई क्रिकेटमधील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल विशेष सत्कार केला.

तत्पूर्वी ३५  षटकांच्या या लढतीत आशीर्वाद क्रिकेट क्लब संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला; पण त्यांचा हा निर्णय साफ चुकीचा ठरला. कारण २८.३ षटकांत  त्यांचा डाव ८९ धावांतच आटोपला. आरव गुप्ता याने टिच्चून गोलंदाजी करताना ५.३ षटकांत केवळ ५ धावांच्या मोबदल्यात ४ विकेट्स मिळवत त्यांच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. त्याला अद्वैत चौधरी (१८/२) , आरव सिंग (९/२), पार्थ लाड (१८/२) यांची चांगली साथ लाभली.  आशीर्वाद सी.सी. संघासाठी आराध्य सकपाळ (२९) आणि मृण्मय पाटील (१९) यांनी थोडाफार प्रतिकार केला.  या आव्हानाचा पाठलाग करताना जितेंद्र आव्हाड क्रिकेट इन्स्टिटयूट संघासाठी मीत करवाडे (नाबाद ३१),  आरव सिंग (१८) आणि अद्वैत यादव (१४) यांनी उपयुक्त फलंदाजी करून २१.५ षटकांतच ४ बाद ९० धावांची मजल मारत विजेतेपद पटकावले. अपेक्षेप्रमाणेच आरव गुप्ता यालाच अंतिम सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.  या स्पर्धेत १८२ धावा करणाऱ्या आराध्य सकपाळ (आशीर्वाद सी.सी.) याला सर्वोत्तम फलंदाजीचे पारितोषिक देण्यात आले.  स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाज म्हणून स्पर्श संगारे(१० बळी), सर्वोत्तम क्षेत्ररक्षक  आणि स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून आरव सिंग (सर्व जितेंद्र आव्हाड क्रिकेट इन्स्टिटयूट ) यांना गौरविण्यात आले.  भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर  आणि मुंबई महापालिकेचे माजी डेप्युटी कमिशनर सुधीर नाईक यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली.

संक्षिप्त धावफलक –   आशीर्वाद क्रिकेट क्लब – २८.३ षटकांत  सर्वबाद ८९ (प्रणव मडवी १०, आराध्य सकपाळ २९, मृण्मय पाटील १९, प्रज्वल किणी नाबाद ११ ; पार्थ लाड १८ धावांत २ बळी, आरव गुप्ता ५ धावांत ४ बळी, अद्वैत चौधरी १८ धावांत २ बळी, आरव सिंग ९ धावांत २ बळी)  पराभूत वि. जीतेंद्र आव्हाड क्रिकेट इन्स्टिटयूट – २१.५ षटकांत ४ बाद ९० (आरव सिंग १८, आरव गुप्ता १०,  मीत करवाडे नाबाद ३१, अद्वैत यादव १४) सर्वोत्तम खेळाडू – आरव गुप्ता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here