चक्रीवादळाचा मंडणगडला महाफटका; 100 हून अधिक वीजखांब जमीनदोस्त

0
33
चक्रीवादळाचा मंडणगडला महाफटका; 100 हून अधिक वीजखांब जमीनदोस्त
चक्रीवादळाचा मंडणगडला महाफटका; 100 हून अधिक वीजखांब जमीनदोस्त

चक्रीवादळाचा मंडणगडला महाफटका; 100 हून अधिक वीजखांब जमीनदोस्त

 दुरुस्तीसाठी महावितरणचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू

रत्नागिरी/मंडणगड – दि. 9 मे रोजी कोकण किनारपट्टीवर आलेल्या भीषण चक्रीवादळ आणि मुसळधार पावसामुळे मंडणगड तालुक्यातील महावितरणच्या वीज वितरण यंत्रणेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे महावितरणच्या उपविभागांतील विसापूर, मंडणगड आणि कुंबळे या तीन शाखांचा वीजपुरवठा पूर्णत: खंडित झाला होता. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावे आणि वाड्या प्रभावित झाल्या आहेत.

चक्रीवादळाच्या तीव्रतेमुळे 33 केव्ही आणि 11 केव्ही या उच्चदाब वाहिन्यांची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे.  उच्चदाब (HT) व लघुदाब (LT) वाहिन्यांचे मिळून 100 हून अधिक वीजखांब कोसळले आहेत. अनेक ठिकाणी झाडे व फांद्या वीजवाहिन्यांवर पडल्याने वाहिन्या तुटल्या असून, काही ठिकाणी त्यांचे कंडक्टर्सही जमिनीवर पडले आहेत.

प्राथमिक अहवालानुसार नुकसानीचा तपशील पुढीलप्रमाणे आहे :

  • 33 केव्ही मंडणगड  : 4 उच्चदाब (HT) खांब व 2 डबल पोल स्ट्रक्चर कोसळले.
  • 33 केव्ही विसापूर  : 2 – 3 उच्चदाब (HT) खांब व 6 ते 7 उच्चदाब (HT) खांब झुकले आहेत. तसेच व्ही-क्रॉस आर्म  कोसळली आहे.
  • 33 केव्ही लिंक लाईन  : 10 – 12 उच्चदाब (HT)  खांबांचे फॅब्रिकेशन कोसळले असून 3 नग डबल पोल स्ट्रक्चर कोसळले आहे.
  • 11 केव्ही धामणी फीडर : 12 उच्चदाब (HT) खांब कोसळले असून 8 उच्चदाब (HT)  खांब झुकले आहेत.
  •  11 केव्ही पालगड फीडर : 23 उच्चदाब (HT) खांब कोसळले असून 9 उच्चदाब (HT) खांब झुकले आहेत.

याशिवाय, तालुक्यातील विविध भागांमध्ये 40 पेक्षा अधिक लघुदाब खांब कोसळले असून अंतर्गत वीजवाहिन्यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणकडून युद्धपातळीवर काम सुरू करण्यात आले आहे. चक्रीवादळाची तीव्रता कमी झाल्यानंतर तत्काळ शाखा अभियंते, तांत्रिक कर्मचारी, वायरमन आणि लाईन स्टाफ यांना विविध भागांत कार्यरत करण्यात आले आहे. नुकसानग्रस्त वाहिन्या, खांब व उपकरणांची दुरुस्ती करण्याचे काम वेगाने सुरू असून, आवश्यक साहित्य, अतिरिक्त मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यात येत आहे. “नुकसानीचा आवाका मोठा असून अनेक दुर्गम भागांत वीज यंत्रणेची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे. तरीही वीज पुरवठा टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यासाठी सर्व कर्मचारी दिवस-रात्र कार्यरत आहेत.”

ग्राहकांना सहकार्य करण्याचे आवाहन

महावितरणने ग्राहकांना या दुरुस्तीच्या काळात सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. ही हानी अत्यंत मोठी असल्याने अनेक भागात, वाडीत आणि प्रत्येक शेतात विजेचे खांब पडलेले आहेत, त्यामुळे कर्मचाऱ्यांना सर्व ठिकाणी एकाच वेळी पोहोचणे अशक्य आहे. त्यामुळे वीज पुरवठा पूर्णतः सुरळीत होण्यासाठी काही कालावधी लागू शकतो, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

नागरिकांनी तुटलेल्या किंवा जमिनीवर पडलेल्या वीजवाहिन्यांपासून सुरक्षित अंतर राखावे तसेच अशा प्रकारची घटना आढळल्यास तात्काळ महावितरणच्या कार्यालयाशी संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. तसेच, ग्राहकांनी महावितरणच्या अधिकृत सूचनांवर विश्वास ठेवावा व कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here