ओल्या काजूगरासाठी ‘वेंगुर्ला १०’ वरदान; कमी तेल, पातळ साल आणि अधिक उत्पादन
वेंगुर्ला l प्रतिनिधी
कोकणासह देश–विदेशातील खवय्यांकडून ओल्या काजूगराला मोठी मागणी आहे. ही वाढती मागणी लक्षात घेऊन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या वेंगुर्ला प्रादेशिक संशोधन केंद्राने खास ओल्या काजूगरासाठी ‘वेंगुर्ला १०’ हा नवीन काजूचा वाण विकसित केला आहे. उत्पादन, चव, प्रक्रिया सुलभता आणि उत्पन्न या सर्व बाबींमध्ये हा वाण सरस ठरला असून, लवकरच या वाणाची कलमे शेतकऱ्यांना लागवडीसाठी उपलब्ध होणार आहेत.
जानेवारीपासून ओल्या काजूचा हंगाम सुरू होतो. गावठी काजूचा हंगाम तुलनेने उशिरा सुरू होतो, तर विद्यापीठ प्रमाणित ‘वेंगुर्ला ६ व ७’ या जातींचा हंगाम लवकर सुरू होतो. मात्र, या जातींच्या काजू बीच्या टरफलाची साल जाड असून तेलाचे प्रमाण अधिक असल्याने गर काढताना अडचणी येतात तसेच त्वचेवर डाग पडतात. या पार्श्वभूमीवर संशोधन करून ‘वेंगुर्ला १०’ हा नवा वाण विकसित करण्यात आला आहे.
‘वेंगुर्ला १०’मध्ये तेलाचे प्रमाण कमी असल्याने त्वचेवर कोणताही अपाय होत नाही. काजू बीची साल पातळ असल्यामुळे गर सहज आणि सुरक्षितरीत्या काढता येतो. विशेष म्हणजे, काजू कलम लागवडीनंतर तिसऱ्या वर्षीपासून मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू होते. हा वाण केवळ ओल्या काजूगरासाठीच नव्हे, तर प्रक्रिया उद्योग आणि थेट खाण्यासाठीही अतिशय उपयुक्त आहे.
या वाणाच्या उत्पादनक्षमतेबाबत बोलायचे झाल्यास, एका किलोमध्ये सुमारे ११४ ते ११५ ओल्या काजू बिया येतात, तर एका किलोपासून २५५ ते २५६ ओले काजूगर मिळतात. चवीला हा काजू अतिशय स्वादिष्ट असून बाजारपेठेत त्याला चांगली मागणी मिळण्याची शक्यता आहे.
यंत्राशिवाय काजूगर काढणे शक्य
सामान्यतः ओल्या काजू बीमधून गर काढणे कठीण असते आणि काढणाऱ्याच्या त्वचेवर डाग पडतात. मात्र, ‘वेंगुर्ला १०’ या वाणामध्ये कोणत्याही यंत्राशिवाय अवघ्या १८ ते २० सेकंदांत काजूगर काढता येतो. विविध स्तरांवरील प्रात्यक्षिकांनंतर संशोधन केंद्राने सुमारे दोन हजार कलमे तयार केली असून, शेतकऱ्यांच्या मागणीनुसार ही कलमे लवकरच लागवडीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.


