कॉजवे पुलाच्या कामादरम्यान मिक्सर ट्रॉली पलटी; चालक थोडक्यात बचावला
कुडाळ l प्रतिनिधी
कुडाळ तालुक्यातील माड्याचीवाडी–रायवाडी परिसरात श्री देव ब्राम्हण मंदिराजवळ सुरू असलेल्या कॉजवे पुलाच्या कामादरम्यान सिमेंट काँक्रीट मिक्सरवाहू ट्रॉलीचा अपघात झाला. पुलाच्या एका बाजूचा मुख्य गाभा अचानक खचल्याने मिक्सर ट्रॉली कॉजवेवरून पलटी होत सुमारे तीन ते चार फूट खाली कोसळली. या अपघातात चालक सुदैवाने बचावला असून त्याच्या खांद्याला किरकोळ दुखापत झाली आहे.
ही घटना गुरुवारी दुपारी सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली. पुलाला आधार देण्यासाठी नवीन संरक्षक भिंतीचे बांधकाम सुरू असतानाच हा अपघात झाला. ट्रॉली पलटी होताच मोठा आवाज झाला. आवाज ऐकताच तेथे काम करणारे इतर कामगार तत्काळ बाजूला सरकले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
अपघातानंतर वाहनाच्या केबिनमध्ये अडकलेल्या चालकाला स्थानिक ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत लोखंडी शिडीच्या साहाय्याने बाहेर काढले. त्यानंतर त्याला उपचारासाठी कुडाळ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून किरकोळ दुखापतीवर उपचार सुरू आहेत.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कॉजवे पुलाचे काम गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून बंद होते. एका सोसायटीमार्फत हे काम ठेकेदाराला देण्यात आले असून गेल्या काही दिवसांपूर्वीच पुन्हा काम सुरू करण्यात आले होते. पुलाला आधार देण्यासाठी नवीन भिंत उभारण्याचे काम सुरू असतानाच पुलाच्या एका बाजूचा मुख्य गाभा कमकुवत झाल्याने हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे.
या अपघातात चालकाचा जीव वाचला असला तरी मिक्सरवाहू ट्रॉलीचे मोठे नुकसान झाले आहे. सायंकाळी उशिरापर्यंत क्रेनच्या सहाय्याने ट्रॉली घटनास्थळावरून बाहेर काढण्याचे काम सुरू होते.


