दादर–रत्नागिरी पॅसेंजर पूर्ववत सुरू करण्याची मागणी
कोकणवासियांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
मुंबई l प्रतिनिधी
कोरोनाच्या संकटाच्या काळात मध्य रेल्वेने बंद केलेली कोकणवासियांच्या हक्काची दादर–रत्नागिरी पॅसेंजर सेवा पूर्ववत सुरू करून कोकणवासियांना दिलासा द्यावा, अशी ठाम मागणी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन या मागणीचा गांभीर्याने विचार करण्याचे साकडे घालण्यात आले आहे.
कोरोनाच्या नावाखाली रेल्वेकडे पुरेशी क्षमता नसल्याचे तसेच वक्तशीरपणाचा मुद्दा उपस्थित करत दादर–रत्नागिरी पॅसेंजर सेवा बंद करण्यात आली होती. त्यानंतर शून्य आधारित नव्या वेळापत्रकात दादरऐवजी दिवा–रत्नागिरी पॅसेंजर सुरू करण्यात आली. मात्र, आजही या गाडीच्या वक्तशीरपणात कोणताही ठोस सुधारणा झालेली नाही, असा आरोप प्रवासी संघटनांनी केला आहे.
पूर्वी दादरहून सुटताना गाडीत पाणी भरण्याची सुविधा उपलब्ध असल्याने ही पॅसेंजर पनवेलहून थेट पुढे रवाना होत होती. सध्या मात्र दिवा स्थानकावर तशी सोय नसल्यामुळे प्रत्येक फेरीत पनवेल स्थानकावर १० ते २० मिनिटे थांबावे लागत आहे. परिणामी मागील गाड्या पुढे काढाव्या लागत असून, यामुळे आणखी सुमारे अर्धा तासाचा विलंब होत आहे.
तसेच १०१०५/१०१०६ क्रमांकाची सावंतवाडी–दिवा आणि ५०१०३/५०१०४ क्रमांकाची रत्नागिरी–दिवा पॅसेंजर या गाड्यांना नेहमीच प्रवाशांची मोठी गर्दी असते. मात्र दिवा स्थानकावरील फलाटांची लांबी अपुरी असल्याने या गाड्यांना दहा पेक्षा अधिक डबे लावता येत नाहीत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून दादर–रत्नागिरी पॅसेंजर पूर्ववत सुरू करणे अत्यावश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.


