कणकवलीच्या जनता दरबारात ९६ निवेदने; गणेशोत्सवापूर्वी प्रश्न मार्गी लावण्याचे पालकमंत्री नितेश राणेंचे निर्देश

0
43
कणकवलीच्या जनता दरबारात ९६ निवेदने; गणेशोत्सवापूर्वी प्रश्न मार्गी लावण्याचे पालकमंत्री नितेश राणेंचे निर्देश
कणकवलीच्या जनता दरबारात ९६ निवेदने; गणेशोत्सवापूर्वी प्रश्न मार्गी लावण्याचे पालकमंत्री नितेश राणेंचे निर्देश

कणकवलीच्या जनता दरबारात ९६ निवेदने; गणेशोत्सवापूर्वी प्रश्न मार्गी लावण्याचे पालकमंत्री नितेश राणेंचे निर्देश

कणकवली :
तालुक्यातील नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या उद्देशाने पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार पंचायत समिती सभागृहात सोमवार, १ सप्टेंबर २०२६ रोजी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले. या जनता दरबारात नागरिकांकडून विविध विभागांशी संबंधित एकूण ९६ निवेदने प्राप्त झाली.
यामध्ये ४२ निवेदने प्रत्यक्ष, तर ५४ निवेदने तोंडी स्वरूपात सादर करण्यात आली. प्राप्त सर्व निवेदनांवर तातडीने कार्यवाही करून गणेशोत्सवापूर्वी संबंधित प्रश्न मार्गी लावावेत आणि करण्यात येणारी कामे गुणवत्तापूर्ण असावीत, असे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी संबंधित विभागांना दिले.
जनता दरबारात महावितरण, सार्वजनिक आरोग्य विभाग, उपजिल्हा रुग्णालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, एसटी महामंडळ आणि बीएसएनएल यांसह विविध विभागांशी संबंधित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

महावितरणकडे सर्वाधिक २२ निवेदने

प्राप्त निवेदनांमध्ये महावितरणकडे २२, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे २३, एसटी महामंडळाकडे १६, आरोग्य विभागाकडे १४, बीएसएनएलकडे ५, तर इतर विभागांकडे १६ निवेदने प्राप्त झाली.
वीजपुरवठ्याशी संबंधित समस्यांबाबत नागरिकांनी आपली भूमिका मांडली. त्यावर महावितरणच्या अधिकाऱ्यांना आवश्यक उपाययोजना करून वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

आरोग्य सेवांचाही आढावा

ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याबाबतही जनता दरबारात चर्चा झाली. उपजिल्हा रुग्णालयातील उपलब्ध सुविधा, रुग्णांना मिळणाऱ्या आरोग्य सेवा, आवश्यक मनुष्यबळ तसेच इतर बाबींचा आढावा घेण्यात आला.

नागरिकांना वेळेत आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले.
याशिवाय रस्त्यांची दुरुस्ती, एसटी बसच्या फेऱ्या, बीएसएनएलच्या दूरसंचार सेवा आणि इतर नागरी सुविधांबाबतही नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले. संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी प्रश्नांबाबत माहिती देत आवश्यक कार्यवाही करण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला.
सभापती हर्षदा वाळके आणि उपसभापती राजेश ऊर्फ सोनू सावंत यांच्या उपस्थितीत झालेल्या या जनता दरबारात पंचायत समिती पदाधिकारी, अधिकारी, लोकप्रतिनिधी, सरपंच आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, पालकमंत्री कार्यालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी मनोज भोगटे, सहाय्यक गटविकास अधिकारी मंगेश वालावलकर, महावितरणचे कार्यकारी अभियंता जयतीलाल भांबरे, एसटी विभाग नियंत्रक प्रदीप घोडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पूजा काळगे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जनता दरबारामुळे नागरिकांना आपल्या समस्या थेट प्रशासनासमोर मांडण्याची संधी मिळाली असून, संबंधित प्रश्नांवर तातडीने कार्यवाही होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here