कणकवलीत ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान अभियान’ शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
कणकवलीत ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान अभियान’ शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
कणकवली :
राज्य शासनाच्या महसूल विभागामार्फत आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान अभियान’ अंतर्गत कणकवली विधानसभा मतदारसंघात आयोजित शिबिरास मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर हे अभियान राबविण्यात येत आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक विधानसभा मतदारसंघात नागरिकांना विविध शासकीय सेवा आणि योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
यावेळी नितेश राणे यांनी सांगितले की, या अभियानाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघांतील नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ, आवश्यक दाखले, प्रमाणपत्रे आणि इतर महसुली सेवा सुलभपणे उपलब्ध करून दिल्या जात आहेत. लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरील समाधान हे शासनाच्या लोकाभिमुख आणि कार्यक्षम प्रशासनाचे प्रतीक असल्याचे त्यांनी नमूद केले.
शासनाच्या सेवा सर्वसामान्यांपर्यंत अधिक पारदर्शक, परिणामकारक आणि सुलभ पद्धतीने पोहोचाव्यात या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमास जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, प्रांताधिकारी जगदीश कातकर, समाजकल्याण सभापती रुहीता तांबे, नगराध्यक्ष संदेश पारकर, सभापती हर्षदा वाळके, देवगड नगराध्यक्षा साक्षी प्रभू, देवगड सभापती गणेश राणे, वैभववाडी नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.