कणकवली नगरपंचायतीचा कारभार गतिमान करा; दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही – नगराध्यक्ष संदेश पारकर

0
148
कणकवली नगरपंचायतीचा कारभार गतिमान करा; दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही – नगराध्यक्ष संदेश पारकर
कणकवली नगरपंचायतीचा कारभार गतिमान करा; दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही – नगराध्यक्ष संदेश पारकर

कणकवली नगरपंचायतीचा कारभार गतिमान करा; दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही – नगराध्यक्ष संदेश पारकर

कणकवली : कणकवली नगरपंचायतीचा कारभार अधिक गतिमान व्हायला हवा. सांडपाणी निचरा व्यवस्था पूर्ण केल्याशिवाय कोणत्याही संकुलांना पूर्णत्वाचा दाखला देऊ नये. शहरातील सर्व सार्वजनिक स्वच्छतागृहांची दररोज सफाई झाली पाहिजे. नळपाणी पुरवठा योजना सुस्थितीत ठेवा, प्रत्येक कर्मचाऱ्यावर कामाची स्पष्ट जबाबदारी निश्चित करा. शहरात कुठेही कचरा दिसता कामा नये. नागरिकांना सेवासुविधा पुरविताना दिरंगाई झाल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी दिला.
नगराध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर बुधवारी त्यांनी आपल्या दालनात नगरपंचायतीच्या प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत नगरसेवक सुशांत नाईक, नगरपंचायतीचे अधीक्षक अमोल अघम, पाणीपुरवठा अधिकारी मनोज धुमाळे, अभियंता सचिन नेरकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. बैठकीत शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची अस्वच्छता, अनधिकृत मच्छी विक्री, अनेक संकुलांमधील सांडपाण्याची समस्या, बंद असलेले पथदीप आदी मुद्द्यांचा आढावा घेण्यात आला.
पटवर्धन चौकातील भाजी मार्केटमध्ये ८६ लाख रुपये खर्चून उभारलेल्या स्वच्छतागृहात पाणीपुरवठा नसल्याने व गळतीमुळे दुर्गंधी पसरत असल्याची बाब निदर्शनास आली. या स्वच्छतागृहावर तातडीने पाण्याची टाकी बसवून नळयोजनेतून पाणीपुरवठा करावा तसेच देखभालीसाठी स्वतंत्र कर्मचारी नियुक्त करण्याचे निर्देश नगराध्यक्ष पारकर यांनी दिले.
शहरात सुसज्ज मच्छीमार्केट असतानाही काही ठिकाणी रस्त्यावर मच्छी विक्री सुरू असल्याने बाजारातील विक्रेत्यांचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी आल्या. यावर शहरातील सर्व ठिकाणांचा आढावा घेऊन विक्रेत्यांशी चर्चा करून त्यांना मच्छीमार्केटमध्ये व्यवसायासाठी प्रवृत्त करण्याचे आदेश देण्यात आले.
कंत्राटी स्वच्छता व नळयोजना कर्मचाऱ्यांना पूर्ण मानधन देण्यात यावे. कागदोपत्री व प्रत्यक्ष मानधनात तफावत राहू नये, अशा स्पष्ट सूचना देत कर्मचारी पुरवठा संस्थांनी किमान नफा ठेवून कर्मचाऱ्यांना न्याय देण्याचे निर्देश देण्यात आले.
शहराची जीर्ण नळयोजना सुधारण्यासाठी तयार केलेल्या सुधारित आराखड्याची सद्यस्थितीची सविस्तर माहिती मागवून तो तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण असल्याची खात्री करण्याचे आदेश देण्यात आले. नगरविकास मंत्रालयाच्या माध्यमातून या आराखड्याला लवकरच मंजुरी मिळवून आणण्याची ग्वाही नगराध्यक्ष पारकर यांनी दिली. तसेच आगामी विकास आराखड्यात नवीन रस्त्यांची योग्य आखणी व अन्यायकारक आरक्षणे टाळण्यासाठी नगरविकास विभागाशी चर्चा केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here