कमी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतीची जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडून पाहणी
कमी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतीची जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडून पाहणी
सिंधुदुर्ग :
जिल्ह्यात यंदा पावसाने ओढ दिल्याने आणि पावसात मोठे खंड पडल्यामुळे काही भागांतील शेतीपिकांवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी मालवण तालुक्यातील पोइप तसेच देवगड तालुक्यातील पोयरे आणि नारिंग्रे येथे प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतीपिकांची पाहणी केली.
पावसातील मोठ्या खंडानंतर जाणवलेल्या उष्णतेमुळे भातासह अन्य पिकांच्या वाढीवर परिणाम झाला असून काही भागांत विहिरींच्या पाणीपातळीतही घट होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी शेतांमध्ये जाऊन भात पिकाची सद्यस्थिती, पिकांची वाढ, उपलब्ध पाणी तसेच पावसाअभावी झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. परिसरातील विहिरींच्या पाणीपातळीची पाहणी करून शेतीसाठी उपलब्ध जलस्रोतांची स्थितीही जाणून घेतली.
यावेळी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधत पावसातील खंडामुळे निर्माण झालेल्या अडचणी मांडल्या. भातशेतीच्या वाढीच्या काळात पावसाने दडी मारल्याने पिकांवर परिणाम झाला असून काही ठिकाणी पिके करपण्याच्या स्थितीत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता असून पावसाच्या अनियमिततेमुळे शेतीचे नियोजनही विस्कळीत झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
पावसाअभावी विहिरींच्या पाणीपातळीत घट होत असल्याने सिंचनासोबतच काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली. यामुळे स्थानिक जलस्रोतांची सद्यस्थिती, उपलब्ध पाणीसाठा आणि आगामी काळातील पाण्याची गरज याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. संपूर्ण जिल्ह्यातील शेतीपिके, पर्जन्यमान, जलस्रोतांची स्थिती आणि पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेऊन सविस्तर अहवाल शासनाला सादर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आवश्यक मदत मिळण्यासाठी वस्तुनिष्ठ माहितीच्या आधारे शासनाकडे मागणी करण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
महसूल, कृषी आणि संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून स्थानिक परिस्थितीनुसार आवश्यक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू आहे.
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे, तहसीलदार मालवण गणेश लव्हे, प्रभारी तहसीलदार देवगड संतोष खरात, मंडल अधिकारी, संबंधित अधिकारी-कर्मचारी तसेच शेतकरी उपस्थित होते. जिल्ह्यातील पर्जन्यमान आणि शेतीची सद्यस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे.