कळसुली हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी २ कोटींची भव्य इमारत उभारून शिक्षण संस्थेला दिले नवे बळ
News :
कळसुली (Kalsuli ) येथील कळसुली इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्सच्या माजी विद्यार्थी व परिवार स्नेहमेळावा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik ) यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
यावेळी बोलताना वैभव नाईक यांनी ग्रामीण भागातील शिक्षण संस्थांचे महत्त्व अधोरेखित करताना, “कळसुली हायस्कूल ही केवळ शाळा नसून समाज परिवर्तनाचे केंद्र आहे. आज ग्रामीण भागातील अनेक शाळा बंद होण्याच्या मार्गावर असताना कळसुली हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन तब्बल २ कोटी रुपयांची भव्य आणि अद्ययावत इमारत उभारली आहे. हा आदर्श ग्रामीण भागातील इतर माजी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे,” असे प्रतिपादन केले.
१९६६ साली स्थापन झालेल्या या शिक्षण संस्थेने अनेक दशकांपासून हजारो गुणवंत विद्यार्थी घडवून समाजाला दिशा दिली असल्याचेही त्यांनी सांगितले. ग्रामीण भागातील सामान्य शेतकरी कुटुंबांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून ही संस्था उभारली, ही त्यांची दूरदृष्टी असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात ७५ वर्षांवरील माजी विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच दहावी आणि बारावी परीक्षेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी कणकवली नगराध्यक्ष Sandesh Parkar, माजी विद्यार्थी अध्यक्ष भालचंद्र दळवी, शिक्षण संघ अध्यक्ष सूर्यकांत दळवी, कार्याध्यक्ष विजय सावंत, माजी जि. प. अध्यक्ष आर. बी. दळवी, मुख्याध्यापक व्ही. व्ही. वगरे, कृषी शास्त्रज्ञ विजय सावंत यांच्यासह अनेक मान्यवर, माजी विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते.
वैभव नाईक यांनी आपल्या आमदारकीच्या काळात मंजूर करण्यात आलेल्या आंब्रड, कळसुली, भडगाव आणि घोडगे परिसरातील धरण प्रकल्पांचाही उल्लेख केला. या प्रकल्पांमुळे भविष्यात पाण्याची उपलब्धता वाढून गावांच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


