पोलिसांच्या सतर्कतेमुळे 2.29 लाखांचा मुद्देमाल जप्त; एक आरोपी जाळ्यात, सहा फरारांचा शोध सुरू
कुडाळ:
‘कायदा सुस्त आहे’ म्हणणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी कारवाई कुडाळ पोलिसांनी करून दाखवली आहे. माणगाव कट्टा येथे माडाच्या बागेत राजरोस सुरू असलेल्या ‘अंदर बाहर’ जुगार अड्ड्यावर मंगळवारी सायंकाळी 5 वाजता धडक छापा टाकत पोलिसांनी खळबळ उडवून दिली.
पोलीस नाईक नितीन राजेंद्र शेडगे यांना मिळालेल्या खात्रीशीर खबरेच्या आधारे ही गुप्त आणि जलद कारवाई करण्यात आली. खेळाच्या मैदानाजवळील माडाच्या बागेत जुगाऱ्यांनी तळ ठोकल्याची टीप मिळताच, कुडाळ पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता सापळा रचला.
पोलिसांची चाहूल लागताच पळापळ, पण एक जाळ्यात
अचानक पोलिसांची गाडी दिसताच जुगाराच्या अड्ड्यावर एकच धांदल उडाली. अंधाराचा व झाडीचा फायदा घेत सातपैकी सहा जुगारी जागेवरून पसार झाले. मात्र, कुडाळ पोलिसांच्या सतर्क पथकाने प्रसंगावधान राखत धुरी नामक 61, वर्षीय व्यक्ती रा. माणगाव बेनवाडी याच्या मुसक्या वेळीच आवळल्या आणि त्याला रंगेहाथ ताब्यात घेतले.
2.29 लाखांचा मुद्देमाल जप्त, 6 फरारांची नावे निष्पन्न
या धडाकेबाज कारवाईत पोलिसांनी एकूण 2 लाख 29 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये 4,900 रुपयांची रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेल्या एक पॅशन प्रो, दोन बजाज डिस्कव्हर व एक बजाज फ्रीडम अशा एकूण चार दुचाकींचा समावेश आहे.
ताब्यात घेतलेल्या धुरी याची कसून चौकशी केली असता, पळून गेलेल्या इतर सहा साथीदारांची नावे पोलिसांच्या हाती लागली आहेत. फरार आरोपींची नावे समजलीअसून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
पोलीस नाईक शेडगेंच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल
पोलीस नाईक नितीन शेडगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कुडाळ पोलीस ठाण्यात सर्व 7 संशयितांविरुद्ध महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम 12 (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘अवैध धंद्यांना थारा नाही’ – पोलिसांचा इशारा
या कारवाईमुळे कुडाळ तालुक्यातील अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. “माणगाव परिसरात कोणताही अवैध धंदा खपवून घेतला जाणार नाही. नागरिकांनी अशा प्रकारांची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी, नाव गुप्त ठेवले जाईल,” अशी माहीती कुडाळ पोलिसांनी दिलीआहे.
खबऱ्यांचे जाळे मजबूत करून आणि वेळीच कारवाई करून कायदा-सुव्यवस्था राखल्याबद्दल कुडाळ पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. फरार आरोपी लवकरच गजाआड होतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे