सिंधुदुर्गात अनधिकृत धंद्यांना पोलीस अधीक्षकांचाच पाठिंबा? आमदार निलेश राणेंचा गंभीर आरोप

0
97
सिंधुदुर्गात अनधिकृत धंद्यांना पोलीस अधीक्षकांचाच पाठिंबा? आमदार निलेश राणेंचा गंभीर आरोप
सिंधुदुर्गात अनधिकृत धंद्यांना पोलीस अधीक्षकांचाच पाठिंबा? आमदार निलेश राणेंचा गंभीर आरोप
सिंधुदुर्गात अनधिकृत धंद्यांना पोलीस अधीक्षकांचाच पाठिंबा? आमदार निलेश राणेंचा गंभीर आरोप
सिंधुदुर्ग | प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कथित अनधिकृत धंद्यांवरून जिल्ह्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, कुडाळ-मालवण मतदारसंघाचे शिवसेना आमदार निलेश राणे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांवर थेट गंभीर आरोप करत मोठी खळबळ उडवून दिली आहे.
आमदार निलेश राणेंचा ‘एक्स’वर पोस्ट बॉम्ब
आमदार निलेश राणे यांनी समाज माध्यम प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर पोस्ट करत म्हटले आहे की,

“सिंधुदुर्गातले सगळे अनधिकृत धंदे आणि त्या धंद्यांना सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक देत असलेला पाठिंबा मला जनतेसमोर ठेवावा लागणार. दोन दिवसांनी या विषयावर पत्रकार परिषद घेणार आहे.”

या पोस्टनंतर जिल्ह्यातील राजकीय तसेच प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. आता दोन दिवसांनी होणाऱ्या पत्रकार परिषदेत आमदार राणे नेमके कोणते पुरावे आणि आरोप समोर आणणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही कारवाई नाही?

या प्रकरणाला आणखी गंभीर स्वरूप प्राप्त झाले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी यापूर्वीच सिंधुदुर्गातील अनधिकृत धंद्यांवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. मात्र, त्या आदेशांनंतरही अपेक्षित कारवाई झाली नसल्याचा आरोप स्थानिक स्तरावरून होत आहे.
यामुळे पालकमंत्र्यांच्या आदेशालाच प्रशासनाने केराची टोपली दाखवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

कोणते आहेत अनधिकृत धंदे?

सिंधुदुर्ग जिल्ह्यात यापूर्वीही अवैध वाळू उपसा, माती उत्खनन, जुगार अड्डे, अवैध धंदे आणि स्थानिक पातळीवरील बेकायदेशीर व्यवहार यावरून अनेकदा वाद निर्माण झाले आहेत. आता सत्ताधारी पक्षाच्या आमदारानेच थेट पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे.

प्रशासनाची भूमिका काय?

दरम्यान, या गंभीर आरोपांवर जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. पोलीस प्रशासन या आरोपांचे खंडन करणार की चौकशीचे आदेश देणार, हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

पत्रकार परिषदेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष

दोन दिवसांनी होणाऱ्या पत्रकार परिषदेत आमदार निलेश राणे कोणती माहिती उघड करणार, कोणत्या अधिकाऱ्यांची नावे घेणार आणि त्यानंतर प्रशासनाची भूमिका काय राहणार, याकडे आता संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here