केंद्राकडून महाराष्ट्राला ७,०२२ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी
केंद्राकडून महाराष्ट्राला ७,०२२ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी
विकासकामांना मिळणार गती
मुंबई, दि. २ : राज्यांच्या आर्थिक व्यवस्थेला अधिक बळकटी देण्यासाठी केंद्र सरकारने देशातील सर्व राज्यांना १ लाख ९ हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त अग्रीम कर-वाटप हप्ता वितरित केला आहे. या वाटपामध्ये महाराष्ट्राला ७,०२२ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आला आहे.
केंद्र सरकारने हा निधी १० ऑगस्ट रोजी होणाऱ्या नियमित मासिक कर हस्तांतरणाव्यतिरिक्त वितरित केला असून, त्यामुळे राज्य सरकारांना विविध विकासकामांसाठी आर्थिक नियोजन अधिक प्रभावीपणे करता येणार आहे.
या अतिरिक्त निधीचा उपयोग पायाभूत सुविधा विकास, भांडवली खर्च, विविध विकास प्रकल्प तसेच लोककल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीसाठी करण्यात येणार आहे. यामुळे राज्यांमधील विकासकामांना गती मिळण्यास मदत होणार असून निधीअभावी रखडलेल्या प्रकल्पांनाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
महाराष्ट्राला मिळालेल्या ७,०२२ कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीमुळे राज्यातील रस्ते, पाणीपुरवठा, सिंचन, आरोग्य, शिक्षण आणि इतर महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना आर्थिक बळ मिळणार आहे. तसेच विविध लोककल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीला अधिक वेग मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज्यांच्या विकासाला चालना देण्याच्या केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात येत असून, यामुळे आर्थिक नियोजन अधिक सक्षम होण्यास मदत होणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.