कोकणचा हापूस संकटात कर्जमाफी व हेक्टरी ५ लाखांची मागणी

0
56
कोकणचा हापूस संकटात कर्जमाफी व हेक्टरी ५ लाखांची मागणी
कोकणचा हापूस संकटात कर्जमाफी व हेक्टरी ५ लाखांची मागणी

कोकणचा हापूस संकटात कर्जमाफी व हेक्टरी ५ लाखांची मागणी

कोकणच्या हापूस आंबा उत्पादकांवर आलेल्या नैसर्गिक व आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण कर्जमाफी आणि हेक्टरी पाच लाखांच्या मदतीची मागणी करत १२ मार्च रोजी ओरोस येथे धडक मोर्चा काढण्याचा इशारा राजू शेट्टी यांनी देवगड येथील एल्गार मेळाव्यात दिला.

कोकणचा जागतिक कीर्तीचा हापूस आंबा यंदा अस्मानी आणि सुल्तानी संकटाच्या कचाट्यात सापडला असून बागायतदार आर्थिकदृष्ट्या कोलमडण्याच्या उंबरठ्यावर आहेत. राज्य सरकारने आगामी अर्थसंकल्पात तातडीने संपूर्ण कर्जमाफी जाहीर करून प्रति हेक्टरी ५ लाख रुपयांची मदत न दिल्यास १२ मार्च रोजी ओरोस येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट धडक मोर्चा काढण्यात येईल, असा खणखणीत इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

देवगड-जामसंडे येथील सांस्कृतिक भवनात आंबा बागायतदार व व्यापाऱ्यांच्या भव्य ‘एल्गार मेळाव्या’त ते बोलत होते. यावेळी परिसरातील शेकडो बागायतदार, व्यापारी आणि शेतकरी उपस्थित होते. कोकणातील आंबा उत्पादकांना यंदा अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण, उष्णतेतील चढ-उतार तसेच वाढता उत्पादन खर्च अशा दुहेरी-तिहेरी संकटांना सामोरे जावे लागत आहे. फुलोऱ्यावर परिणाम झाल्याने उत्पादन घटले असून बाजारपेठेत अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे गणित कोलमडले आहे.

शेट्टी म्हणाले, “हापूस हा केवळ फळ नसून कोकणच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह या फळावर अवलंबून आहे. मात्र शासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे वेळेत होत नाहीत, विमा योजनांचा लाभ वेळेवर मिळत नाही आणि बाजारात दलालांचे वर्चस्व वाढत आहे.” त्यामुळे सरकारने तातडीने विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

मेळाव्यात १२ मार्च रोजी ओरोस जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठ्या संख्येने उपस्थित राहून मोर्चा काढण्याचा निर्धार करण्यात आला. शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला. कोकणच्या हापूस उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटना शेवटपर्यंत लढा देईल, असा ठाम निर्धार शेट्टी यांनी व्यक्त केला. अशा परिस्थितीत संपूर्ण कर्जमाफी आणि थेट आर्थिक मदत हाच एकमेव पर्याय असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here