कोकणातील जल, जंगल, जमीन वाचवण्यासाठी गांधी मार्गाने लढा द्या; ग्रामसभांमध्ये प्रकल्पविरोधी ठराव करा – देवेंद्र गावंडे
कोकणातील जल, जंगल, जमीन वाचवण्यासाठी गांधी मार्गाने लढा द्या! ग्रामसभांमध्ये प्रकल्पविरोधी ठराव करा – ज्येष्ठ संपादक देवेंद्र गावंडे
कणकवली (प्रतिनिधी) :
कोकणातील जल, जंगल आणि जमीन हीच या प्रदेशाची खरी संपत्ती आहे. मात्र, सरकारकडून पंप स्टोरेज प्रकल्प, अणुऊर्जा प्रकल्प आणि रिफायनरीसारखे प्रकल्प कोकणात आणले जात असून, त्यांच्या माध्यमातून येथील नैसर्गिक संपत्तीची मोठ्या प्रमाणावर हानी होण्याची भीती आहे. त्यामुळे कोकणी माणसांनी आपल्या हक्काच्या जमिनी, निसर्ग आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी संघटित होऊन संघर्ष केला पाहिजे. हा लढा केवळ रस्त्यावर उतरून न लढता कायदेशीर मार्गानेही लढणे आवश्यक आहे. पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या प्रकल्पांविरोधात ग्रामसभांमध्ये ठराव मंजूर करा. असे ठराव झाल्यास अशा प्रकल्पांची उभारणी करणे सरकारसाठी कठीण होईल. अन्यायाविरोधात महात्मा गांधींच्या विचारांनी आणि अहिंसक मार्गाने लढा द्या. कारण महात्मा गांधी हा केवळ व्यक्ती नसून एक विचार आहे आणि हा विचार कोणीही संपवू शकत नाही, असे आवाहन ज्येष्ठ लेखक तथा संपादक देवेंद्र गावंडे यांनी केले. महाराष्ट्रात सध्या अतिरेकी विकास सुरू असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या १०७ हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी गोपुरी आश्रमाच्या वतीने आश्रमातील चिकूच्या बागेत उभारण्यात आलेल्या पर्यावरणतज्ज्ञ माधवराव गाडगीळ विचारपीठावर विशेष अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत देवेंद्र गावंडे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
यावेळी ज्येष्ठ साहित्यिक जयप्रकाश लब्दे, गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर, सेवानिवृत्त माहिती अधिकारी सतीश लळीत आणि उद्योजक सुरेश नेरूळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कोकणाच्या अस्तित्वासाठी कायदेशीर लढ्याची गरज!
यावेळी बोलताना सतीश लळीत यांनीही कोकणातील पर्यावरणीय प्रश्नांवर चिंता व्यक्त केली. सरकारविरोधात भूमिका मांडणाऱ्यांना थेट ‘अर्बन नक्षलवादी’ ठरवले जात असल्याची बाब चिंताजनक असल्याचे त्यांनी सांगितले. प्रकल्पांच्या नावाखाली कोकणातील जल, जंगल आणि जमिनी ओरबाडल्या जाणार असतील, तर कोकणी माणसाने कायदेशीर आयुधांचा वापर करून त्याविरोधात ठामपणे लढा दिला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा इतिहास विशद केला. तसेच गोपुरी आश्रमाच्या सामाजिक आणि पर्यावरणविषयक कार्याची माहिती उपस्थितांना दिली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी गोपुरी आश्रमाच्या वतीने मान्यवरांचे पुस्तक भेट देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर असरोंडी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रगीत सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. कार्यक्रमाच्या शेवटी ज्येष्ठ साहित्यिक जयप्रकाश लब्दे यांनी संयुक्त महाराष्ट्र एकसंघ ठेवण्याची शपथ उपस्थितांना दिली.
या अभिवादन सभेला गोपुरीचे सचिव विनायक ऊर्फ बाळू मेस्त्री, उपाध्यक्ष व्ही. के. सावंत, खजिनदार विनायक सापळे, सदस्य संदीप सावंत, अर्पिता मुंबरकर, महानंदा चव्हाण, कमलाकर निग्रे, नितीन तळेकर यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.