तराळे येथे चैतन्य नर्सिंग होमचे उद्घाटन; सिंधुदुर्गच्या आरोग्यसेवेत आधुनिक सुविधांची भर
तराळे येथे चैतन्य नर्सिंग होमचे उद्घाटन; सिंधुदुर्गच्या आरोग्यसेवेत आधुनिक सुविधांची भर
खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, सौ. नीलमताई राणे आणि आमदार निलेश राणे यांची उपस्थिती; ऑर्थोपेडिक उपचारांसह वंध्यत्व निवारणाच्या सुविधा उपलब्ध होणार
कणकवली (प्रतिनिधी) :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार आणि आधुनिक वैद्यकीय उपचारांसाठी गोवा, कोल्हापूर किंवा मुंबईसारख्या शहरांकडे धाव घ्यावी लागू नये, यासाठी जिल्ह्यातच सक्षम आरोग्य सुविधा निर्माण होणे काळाची गरज आहे. या दिशेने कणकवली तालुक्यातील तराळे येथे सुरू झालेल्या चैतन्य नर्सिंग होम, ऑर्थोपेडिक अँड इन्फर्टिलिटी सेंटरच्या माध्यमातून सिंधुदुर्गच्या आरोग्यसेवेत महत्त्वाची भर पडली आहे. माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे, सौ. नीलमताई राणे, पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत या रुग्णालयाचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला.
या उद्घाटन सोहळ्याला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अपूर्वा बासूर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्यासह डॉ. मिलिंद कुलकर्णी, डॉ. ऋचा कुलकर्णी आणि वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
रुग्णाला बरे करणे हाच डॉक्टरांचा खरा धर्म!
यावेळी खासदार नारायण राणे यांनी डॉक्टरांना रुग्णसेवेचे महत्त्व पटवून देताना सांगितले की, एखाद्या रुग्णालयाची ओळख त्याच्या भव्य इमारतीवर किंवा उद्घाटन सोहळ्यावरून ठरत नाही, तर तेथून उपचार घेऊन रुग्ण किती समाधानाने आणि ठणठणीत बरा होऊन बाहेर पडतो, यावर ठरते. डॉक्टरांनी आपले ज्ञान, अनुभव आणि कौशल्य यांचा योग्य वापर करून प्रत्येक रुग्णाला न्याय दिला पाहिजे. रुग्णांचा विश्वास संपादन करणे हेच कोणत्याही रुग्णालयाचे खरे यश आहे.
स्थानिक तरुण डॉक्टरांनी जिल्ह्यातच सेवा द्यावी!
पालकमंत्री नितेश राणे यांनी डॉ. कुलकर्णी कुटुंबीयांच्या वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाचे कौतुक केले. उच्च शिक्षण आणि आधुनिक वैद्यकीय कौशल्य संपादन केल्यानंतर तरुण डॉक्टरांनी आपल्या जिल्ह्यात परतून स्थानिक जनतेची सेवा करावी. डॉ. कुलकर्णी कुटुंबाच्या पुढील पिढीने हा आदर्श जपला आहे, ही अभिमानाची बाब असल्याचे ते म्हणाले.
सिंधुदुर्गातील रुग्णांना गंभीर आजारांच्या उपचारांसाठी गोवा किंवा कोल्हापूर येथे जावे लागू नये, यासाठी जिल्ह्यातच सक्षम आणि आधुनिक आरोग्य सुविधा विकसित होणे आवश्यक आहे. अशा आरोग्य संस्थांमुळे स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी आमदार निलेश राणे यांनीही चैतन्य नर्सिंग होमच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांना उपलब्ध होणाऱ्या वैद्यकीय सुविधांबद्दल समाधान व्यक्त करून रुग्णालयाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
ऑर्थोपेडिक उपचारांसह वंध्यत्व निवारणाच्या सुविधा
तराळे येथील या सेंटरमध्ये हाडांचे विकार, सांधे आणि अस्थिरोगविषयक उपचारांसह वंध्यत्व निवारणासंदर्भातील वैद्यकीय सेवा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे कणकवलीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांना स्थानिक पातळीवर विशेष वैद्यकीय उपचारांची सुविधा मिळण्यास मदत होणार आहे. चैतन्य नर्सिंग होमच्या प्रारंभामुळे जिल्ह्याच्या आरोग्यसेवेला आधुनिकतेची नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.