‘कोयना बॅकवॉटर फेस्टिव्हल २०२६’ जागतिक दर्जाचा करण्यासाठी शासन कटिबद्ध – शंभूराज देसाई

0
7
‘कोयना बॅकवॉटर फेस्टिव्हल २०२६’ जागतिक दर्जाचा करण्यासाठी शासन कटिबद्ध – शंभूराज देसाई
‘कोयना बॅकवॉटर फेस्टिव्हल २०२६’ जागतिक दर्जाचा करण्यासाठी शासन कटिबद्ध – शंभूराज देसाई

‘कोयना बॅकवॉटर फेस्टिव्हल २०२६’ जागतिक दर्जाचा करण्यासाठी शासन कटिबद्ध – शंभूराज देसाई

साहसी पर्यटन, नैसर्गिक सौंदर्य आणि स्थानिक संस्कृतीचा अनोखा संगम

मुंबई : ‘कोयना बॅकवॉटर फेस्टिव्हल २०२६’ अधिक भव्य, आकर्षक आणि जागतिक दर्जाचा करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून हा महोत्सव महाराष्ट्राच्या पर्यटन क्षेत्राला नवी ओळख देणारा ठरेल, असा विश्वास पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला.
‘मेघदूत’ या शासकीय निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या कोयना बॅकवॉटर फेस्टिव्हल २०२६ संदर्भातील आढावा बैठकीत ते बोलत होते. कोयना परिसरातील निसर्गसंपदा, साहसी पर्यटनाच्या संधी आणि स्थानिक संस्कृतीचा संगम घडवून पर्यटकांना वेगळा अनुभव देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी अंतिम स्थळ निश्चित करण्यासाठी आवश्यक जागेची पाहणी, वाहतूक व्यवस्थापन, पोलीस बंदोबस्त, पार्किंग व्यवस्था तसेच पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजनांचे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या.
सर्व विभागांनी परस्पर समन्वय ठेवून नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे, जेणेकरून देश-विदेशातील पर्यटकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध होतील आणि महोत्सवाचे आयोजन यशस्वी होईल, असेही मंत्री देसाई यांनी नमूद केले.
बैठकीस पर्यटन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय खंदारे, पर्यटन संचालनालयाचे माजी संचालक मंगेश जोशी, नवनियुक्त संचालक विकास पानसरे, उपसचिव संतोष रोकडे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र सोनवणे, सहसंचालक संतोष जाधव, सहाय्यक संचालक रविंद्र पवार तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे सातारा जिल्हाधिकारी, सातारा उपवनसंरक्षक, वाई-महाबळेश्वर उपविभागीय अधिकारी आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
पर्यटनवृद्धीबरोबरच स्थानिक रोजगारनिर्मिती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या दृष्टीने ‘कोयना बॅकवॉटर फेस्टिव्हल २०२६’ महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here