नागपूरमध्ये उभारणार जागतिक दर्जाचे कन्व्हेन्शन सेंटर

0
7
नागपूरमध्ये उभारणार जागतिक दर्जाचे कन्व्हेन्शन सेंटर
नागपूरमध्ये उभारणार जागतिक दर्जाचे कन्व्हेन्शन सेंटर

नागपूरमध्ये उभारणार जागतिक दर्जाचे कन्व्हेन्शन सेंटर

२०२९ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात आढावा बैठक

मुंबई :
नागपूरला आंतरराष्ट्रीय परिषद, प्रदर्शन आणि व्यावसायिक कार्यक्रमांचे प्रमुख केंद्र म्हणून विकसित करण्याच्या उद्देशाने शहरात जागतिक दर्जाचे बहुउद्देशीय कन्व्हेन्शन आणि एक्झिबिशन सेंटर उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे सादरीकरण बैठक पार पडली.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, हा प्रकल्प नागपूरच्या आर्थिक विकासाला, पर्यटन क्षेत्राला, उद्योग व्यवसायांना तसेच रोजगारनिर्मितीला मोठी चालना देणारा ठरेल. २०२९ पर्यंत हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प कार्यान्वित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
नागपूर कन्व्हेन्शन सेंटर हे केवळ परिषद, प्रदर्शन आणि व्यावसायिक कार्यक्रमांचे ठिकाण न राहता शहराच्या सांस्कृतिक ओळखीचे प्रतीक बनावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली. यासाठी वास्तुरचना आकर्षक, आधुनिक तंत्रज्ञानयुक्त आणि पर्यावरणपूरक असावी, अशा सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
आधुनिक वास्तुशैलीबरोबरच ऊर्जा बचत, हरित तंत्रज्ञान, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासाच्या संकल्पनांचा प्रभावी वापर प्रकल्पात करण्यात यावा, असेही त्यांनी नमूद केले.
बैठकीस मुख्य सचिव राजेश अग्रवाल, ‘मित्रा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर, नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विपीन इटनकर उपस्थित होते. तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे फिरा बार्सिलोना इंटरनॅशनल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रिकार्ड झेपाटेरो यांनी सहभाग नोंदविला.
या प्रकल्पामुळे नागपूरची ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिषद आणि प्रदर्शनांचे केंद्र म्हणून निर्माण होण्यास मदत होणार असून विदर्भाच्या विकासाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here