कोस्टल रोडवर ‘जय हो’ची धून
मुंबई I प्रतिनिधी
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज किनारी मार्गावर (मुंबई कोस्टल रोड) आता वाहनचालकांना एक अनोखा आणि अभिमानास्पद अनुभव मिळणार आहे. या मार्गावर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ‘संगीत पट्टे’ बसविण्यात आले असून, त्यावरून वाहन गेले की ‘स्लमडॉग मिलेनियर’ चित्रपटातील ऑस्कर विजेते ‘जय हो’ हे गाणे ऐकू येणार आहे. हा जगातील पाचवा आणि भारतातील पहिलाच ‘मेलडी रोड’ प्रयोग ठरणार आहे.
या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवार,११ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १२.३० वाजता होणार आहे. माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या संकल्पनेतून हा प्रयोग साकारण्यात आला असून, मुंबई महानगरपालिकेने त्याची अंमलबजावणी केली आहे.
नरिमन पॉईंटकडून वरळीकडे जाणाऱ्या उत्तरमार्गिकेवर, भूमिगतबोगद्यातून बाहेर पडल्यानंतर दुभाजकाला लागून असलेल्या पहिल्या मार्गिकेवर सुमारे ५०० मीटर अंतरावर हे विशेष संगीत पट्टे बसविण्यात आले आहेत. वाहन ताशी ७० ते ८० किलोमीटर वेगाने या पट्ट्यांवरून गेल्यास चाकांच्या घर्षणातून निर्माण होणाऱ्या ध्वनीलहरींमधून ‘जय हो’ या गीताची धून ऐकू येते. हा अनुभव वाहनातील प्रवाशांना स्पष्टपणे जाणवेल, अशी रचना करण्यात आली आहे.
‘मेलडी रोड’ ही संकल्पना प्रथम २००७ मध्ये जपानमध्ये विकसित झाली. जपानी अभियंता शिझुओ शिनोडा यांनी रस्त्यावर काम करताना चाकांच्या घर्षणातून निर्माण होणाऱ्या ध्वनीचे निरीक्षण केले आणि त्यातून ही कल्पना साकारली.


