क्रांतीज्योती बाल संगोपन योजना; अनाथ व निराधार बालकांसाठी दरमहा २,२५० रुपयांची मदत
मुंबई : प्रतिनिधी
अनाथ, निराधार व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांच्या संगोपनासाठी राज्य शासनाने ‘क्रांतीज्योती बाल संगोपन योजना’ प्रभावीपणे राबविली आहे. या योजनेअंतर्गत ० ते १८ वयोगटातील मुला-मुलींना संस्थेत न ठेवता कौटुंबिक वातावरणात त्यांचा विकास घडवून आणण्यावर भर दिला जात आहे.
महिला व बाल विकास विभागाच्या ३० मे २०२२ च्या शासन निर्णयानुसार तसेच बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ आणि सुधारित २०२१ तरतुदींनुसार ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा मुख्य उद्देश बालकांना सुरक्षित, प्रेमळ आणि कौटुंबिक वातावरणात वाढण्याची संधी उपलब्ध करून देणे हा आहे.
या योजनेअंतर्गत पात्र बालकांना शिक्षणासाठी दरमहा २,२५० रुपये थेट लाभ देण्यात येतो. अनाथ, निराधार, बेघर, दुर्धर आजारी पालकांची मुले तसेच कैद्यांची मुले या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी जवळच्या अंगणवाडी सेविका, पंचायत समिती किंवा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


