खरबाची आदिवासी वाडीत जिल्हाधिकारी किशन जावळे यांचा संवाद; ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या
खरबाची आदिवासी वाडीत जिल्हाधिकारी किशन जावळे यांचा संवाद; ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या
माणगाव, प्रतिनिधी :Kishan Jawale यांनी माणगाव तालुक्यातील गांगवली ग्रामपंचायत हद्दीतील खरबाची आदिवासी वाडीला सदिच्छा भेट देत ग्रामस्थांशी थेट संवाद साधला. यावेळी त्यांनी आदिवासी बांधव, महिला आणि मुलांच्या समस्या जाणून घेत विविध शासकीय योजनांची माहितीही दिली.
जिल्हाधिकाऱ्यांच्या अभिनव “संवाद सेतू अर्थात हितगुज” उपक्रमांतर्गत आयोजित कार्यक्रमात खरबाची वाडीतील नागरिक तसेच विविध विभागांच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधण्यात आला.
“जनजातीय गरिमा दिवस” आणि “सबसे दूर, सबसे पहले” अभियानाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या कार्यक्रमात दुर्गम भागातील नागरिकांच्या अडचणी, मूलभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण आणि शासकीय योजनांच्या अंमलबजावणीबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी माणगावचे उपविभागीय अधिकारी श्री. सानप (Sanap), प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास विभाग सौ. तेजस्विनी गलांडे (Tejaswini Galande), गटविकास अधिकारी सौ. शुभदा पाटील (Shubhada Patil),आरोग्य विभाग, महिला व बालविकास विभागाचे अधिकारी तसेच विविध विभागांचे क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी जावळे यांनी ग्रामस्थांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकून घेत संबंधित विभागांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. दुर्गम आणि आदिवासी भागांतील नागरिकांपर्यंत शासनाच्या योजना प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.