‘संडे ऑन सायकल’ मोहिमेचे ७ जून रोजी सिंधुदुर्ग जिल्हाभर आयोजन; नागरिकांना सहभागाचे आवाहन
ओरोस, प्रतिनिधी : तंदुरुस्त, निरोगी आणि सक्रिय भारत घडविण्याच्या उद्देशाने तसेच ‘जागतिक सायकल दिना’ (World Bicycle Day ) चे औचित्य साधून जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या वतीने रविवार, ७ जून २०२६ रोजी संपूर्ण जिल्ह्यात ‘संडे ऑन सायकल’ ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील ग्रामपंचायत आणि तालुका स्तरावर आयोजित करण्यात येणाऱ्या या उपक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर (Ravindra Khebudkar) यांनी केले आहे.
भारत सरकारच्या ‘फिट इंडिया मिशन (Fit India Mission) आणि स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) (Swachh Bharat Mission Gramin )अंतर्गत ही जिल्हाव्यापी मोहीम आयोजित करण्यात आली आहे. या माध्यमातून नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे, नियमित व्यायामाचे महत्त्व पटवून देणे आणि स्वच्छतेचा संदेश गावागावांत पोहोचविणे हा मुख्य उद्देश आहे.
या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकाऱ्यांना पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावर आवश्यक नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तालुका तसेच ग्रामपंचायत स्तरावर सायकल रॅलींचे आयोजन करण्यात येणार असून पर्यावरणपूरक जीवनशैली, शारीरिक तंदुरुस्ती आणि स्वच्छतेचा संदेश दिला जाणार आहे.
या उपक्रमात लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी-कर्मचारी, स्वच्छतादूत, महिला बचत गट सदस्य, शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांचा सक्रिय सहभाग अपेक्षित आहे. सहभागी नागरिकांची आणि संस्थांची नोंदणी भारत सरकारच्या फिट इंडिया मिशनच्या अधिकृत संकेतस्थळावर केली जाणार आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी सांगितले की, सायकल चालविणे हे आरोग्यासाठी लाभदायक असून पर्यावरण संरक्षणासाठीही महत्त्वाचे आहे. त्यामुळे विशेषतः युवक, विद्यार्थी आणि सर्व नागरिकांनी ७ जून रोजी आपल्या परिसरातील सायकल रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी होऊन या मोहिमेला लोकचळवळीचे स्वरूप द्यावे.