खेड तालुक्यातील जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवर; प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन
रत्नागिरी पाटबंधारे मंडळाचा नदी पाणीपातळी अहवाल जाहीर
रत्नागिरी | प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर खेड तालुक्यातील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, रविवारी (५ जुलै) सायंकाळी ४.३० वाजताच्या अहवालानुसार नदीची पाणीपातळी ९.८० मीटर इतकी नोंदविण्यात आली आहे.
रत्नागिरी पाटबंधारे मंडळाच्या पूर नियंत्रण कक्षाने प्रसिद्ध केलेल्या नदी पाणीपातळी अहवालानुसार जगबुडी नदी सध्या धोका पातळीच्या वरून वाहत असल्याने नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रशासनाने संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असून, नदीकाठच्या नागरिकांनी विनाकारण नदीपात्रात किंवा पुराच्या पाण्यात जाणे टाळावे तसेच स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.