ई-ऑफिस आणि एआयचा प्रभावी वापर करणारी जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत;
नाविन्यपूर्ण उपक्रमांचे रुबल अग्रवाल यांनी केले कौतुक
सावंतवाडी | प्रतिनिधी
कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी सावंतवाडी तालुक्यातील भालावल ग्रामपंचायतीला भेट देऊन ग्रामपंचायतीमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध नाविन्यपूर्ण आणि डिजिटल उपक्रमांचा आढावा घेतला. ग्रामीण प्रशासनात ई-ऑफिस प्रणाली आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून सुशासनाची नवी दिशा निर्माण केल्याबद्दल त्यांनी ग्रामपंचायतीच्या कार्याचे विशेष कौतुक केले.
भालावल ग्रामपंचायत ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात ई-ऑफिस प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी करणारी पहिली ग्रामपंचायत ठरली असून, कार्यालयीन कामकाजातील पारदर्शकता, गतिमान सेवा आणि नागरिकाभिमुख प्रशासनासाठी केलेले कार्य इतर ग्रामपंचायतींसाठी प्रेरणादायी असल्याचे विभागीय आयुक्तांनी नमूद केले.
यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शितल पुंड, प्रभारी उपविभागीय अधिकारी विरसिंग वसावे, तहसीलदार श्रीधर पाटील, ग्रामसेविका तृप्ती राणे, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामसेविका तृप्ती राणे यांनी ग्रामपंचायतीच्या विविध योजना आणि उपक्रमांचे सादरीकरण केले.
भेटीदरम्यान विभागीय आयुक्तांनी ‘उमेद’ अभियानांतर्गत कार्यरत महिला बचत गटांनी तयार केलेल्या स्थानिक उत्पादनांची पाहणी केली. ग्रामीण महिलांनी स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिक सक्षमीकरणाचा मार्ग स्वीकारल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आणि उत्पादनांचे मूल्यवर्धन व बाजारपेठ विस्तारासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
तसेच प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थीच्या घरकुलाला भेट देऊन त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली व लाभार्थ्यांशी संवाद साधत योजनेच्या परिणामांची माहिती घेतली. शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ प्रत्येक पात्र व्यक्तीपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी प्रशासनाने अधिक संवेदनशील आणि सक्रियपणे काम करावे, असे त्यांनी सांगितले.
गावातील महिला, ग्रामस्थ आणि लाभार्थ्यांशी संवाद साधताना आधुनिक तंत्रज्ञान, लोकसहभाग आणि पारदर्शक प्रशासन यांच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला अधिक गती देता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायतीने राबविलेल्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहितीही यावेळी देण्यात आली.