खोपोली मत्स्यबीज केंद्राचे हित अबाधित राहणार; पाणी साठवण प्रकल्पाबाबत मंत्रालयात आढावा बैठक

0
11
खोपोली मत्स्यबीज केंद्राचे हित अबाधित राहणार; पाणी साठवण प्रकल्पाबाबत मंत्रालयात आढावा बैठक
खोपोली मत्स्यबीज केंद्राचे हित अबाधित राहणार; पाणी साठवण प्रकल्पाबाबत मंत्रालयात आढावा बैठक
मुंबई | प्रतिनिधी
खोपोली नगरपरिषद हद्दीतील मत्स्यव्यवसाय विभागाच्या जागेवर प्रस्तावित पाणी साठवण प्रकल्पासंदर्भात मंत्रालयात आढावा बैठक पार पडली. यावेळी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी खोपोली मत्स्यबीज केंद्राचे हित कोणत्याही परिस्थितीत अबाधित ठेवले जाईल, अशी ग्वाही दिली.

बैठकीत बोलताना मंत्री राणे म्हणाले की, खोपोली मत्स्यबीज केंद्र हे राज्यातील मत्स्य संवर्धन आणि मत्स्यबीज निर्मितीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहे. त्यामुळे या केंद्राच्या भवितव्याबाबत कोणताही निर्णय घेताना मत्स्य उत्पादन, मत्स्यबीज निर्मिती आणि मत्स्यव्यवसायिकांचे हित यांना सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल.
खोपोली नगरपरिषदेच्या हद्दीतील मत्स्यबीज केंद्राची जागा भविष्यातील पाणी साठवण प्रकल्पासाठी देण्यात येणार असली तरी मत्स्यव्यवसाय विभागाचे हित अबाधित ठेवत सर्व संबंधित विभागांशी समन्वय साधून योग्य तोडगा काढला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महसूल, नगररचना तसेच इतर संबंधित विभागांशी समन्वय साधून कायदेशीर आणि प्रशासकीय चौकटीत सकारात्मक निर्णय घेण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. प्रकल्पाच्या अंमलबजावणीदरम्यान मत्स्यव्यवसायाशी संबंधित कोणत्याही घटकावर प्रतिकूल परिणाम होणार नाही याची काळजी घेतली जाईल, असेही बैठकीत सांगण्यात आले.
या बैठकीस आमदार महेंद्र थोरवे, मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव रामास्वामी एन., मत्स्यआयुक्त प्रेरणा देशभ्रतार, रायगड जिल्हाधिकारी (दूरदृश्य प्रणालीद्वारे) तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here