लोकहिताच्या पाच प्रमुख मागण्यांसाठी श्रीराम इदाते यांचे स्वातंत्र्यदिनी आमरण उपोषण
लोकहिताच्या पाच प्रमुख मागण्यांसाठी श्रीराम इदाते यांचे स्वातंत्र्यदिनी आमरण उपोषण; प्रशासनाला दिला अंतिम इशारा!
दापोली | प्रतिनिधी : अरविंद मांडवकर
दापोली तालुक्यातील प्रलंबित व जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडित विविध प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याच्या मागणीसाठी पंचायत समिती सदस्य तथा भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष श्रीराम (भाऊ) इदाते यांनी १५ ऑगस्ट २०२६ रोजी दापोली तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भातील निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केले असून, अनेक महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून ठोस कार्यवाही न झाल्याने अखेर उपोषणाचा मार्ग स्वीकारल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
इदाते यांनी दिलेल्या निवेदनात दापोली तालुक्यातील पाच महत्त्वाच्या लोकहिताच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली आहे. १) दापोली एस.टी. आगारासाठी मंजूर झालेल्या १६ एस.टी. बसेस पैकी केवळ पाचच बस उपलब्ध असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच २) राज्य मार्ग क्रमांक १७ च्या कामादरम्यान पालगड नळपाणी योजनेचे झालेले नुकसान तातडीने दुरुस्त करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
याशिवाय ३) किनारपट्टी भागातील महावितरण (MSEB) कडून अंडरग्राउंड वीजवाहिन्या टाकताना रस्त्यांचे झालेले नुकसान संबंधित ग्रामपंचायतींना भरपाई स्वरूपात देण्यात यावे, अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे. तसेच ४) पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांना मोफत वाळू उपलब्ध करून द्यावी आणि ५) दापोली तालुक्यात सुरू असलेल्या जंगलतोडीची सखोल चौकशी करून मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्यात यावी, अशा मागण्यांचाही निवेदनात समावेश आहे.
या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, संबंधित मंत्री, कोकण विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तसेच विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविण्यात आल्या आहेत. स्वातंत्र्यदिनी जाहीर करण्यात आलेल्या आमरण उपोषणापूर्वी प्रशासन या पाच मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेणार की संघर्ष अधिक तीव्र होणार, याकडे आता संपूर्ण दापोली तालुक्याचे लक्ष लागले आहे.