खोल समुद्रातील मच्छिमारांसाठी सॅटेलाईट फोन सुविधा; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ५ फोनचे प्रतीकात्मक वितरण

0
8

मुंबई | प्रतिनिधी
राज्यातील खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या मच्छिमार बांधवांची सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रतीकात्मक स्वरूपात पाच सॅटेलाईट फोनचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे समुद्रात असलेल्या मच्छिमारांना मोबाईल नेटवर्क नसतानाही किनाऱ्याशी संपर्क साधणे शक्य होणार आहे.
मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाद्वारे मच्छिमारांना इनकमिंग आणि आउटगोइंग अशा दोन्ही प्रकारच्या संपर्काची सुविधा उपलब्ध होणार आहे. खोल समुद्रात मासेमारी करताना आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळणे, हवामानातील बदलांची माहिती वेळेवर मिळणे तसेच सुरक्षेसंदर्भातील महत्त्वाच्या सूचना प्राप्त होणे यासाठी ही सुविधा उपयुक्त ठरणार आहे.
शासनाच्या या निर्णयामुळे मच्छिमारांच्या जीवित सुरक्षेला अधिक बळकटी मिळणार असून समुद्रातील संप्रेषण व्यवस्था अधिक सक्षम होणार आहे. मच्छिमार बांधवांचे प्राण आणि उपजीविका सुरक्षित ठेवणे ही शासनाची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
बीएसएनएलच्या सहकार्याने उपलब्ध होणारी ही सॅटेलाईट फोन सेवा खोल समुद्रातील मच्छिमारांसाठी जीवनदायी संपर्क व्यवस्था ठरणार आहे. यामुळे आपत्कालीन मदत, बचावकार्य आणि समुद्रातील सुरक्षा व्यवस्थेची परिणामकारकता वाढण्यास मदत होणार असून राज्यातील मत्स्य व्यवसायाला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here