ठाणेतील ९०० खाटांच्या अत्याधुनिक सिव्हील हॉस्पिटलचे काम फास्टट्रॅकवर पूर्ण करा - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ठाणेतील ९०० खाटांच्या अत्याधुनिक सिव्हील हॉस्पिटलचे काम फास्टट्रॅकवर पूर्ण करा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई | प्रतिनिधी
ठाणे शहरातील सिव्हील हॉस्पिटलच्या सद्यस्थितीचा तसेच प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक आयोजित करण्यात आली. ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील नागरिकांना जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ९०० खाटांच्या अत्याधुनिक जिल्हा सामान्य रुग्णालय, महिला व बाल रुग्णालय आणि सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचा प्रकल्प फास्टट्रॅक पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.
बैठकीत रुग्णालयाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. रुग्णालयाची इमारत पूर्ण झाली असली तरी वीज जोडणीअभावी रुग्णालय सुरू करण्यात अडचणी येत असल्याचा मुद्दा चर्चेत आला. यावर रुग्णालयासारख्या अत्यावश्यक सेवेसाठी आवश्यक असलेली सर्व वीज जोडणीची कामे विहित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले.
तसेच रुग्णालय परिसराची नियमित आणि उच्च दर्जाची स्वच्छता राखण्याबरोबरच अत्याधुनिक वैद्यकीय यंत्रसामुग्रीची तातडीने खरेदी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. काही दिवसांपूर्वी शासनाने मंजूर केलेली १,०७८ नवीन पदे वेळेत भरण्यासाठी भरती प्रक्रिया गतीमान करण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ठाणे व पालघर जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे ही शासनाची प्राथमिकता असल्याचे सांगत प्रकल्पातील सर्व अडथळे दूर करून रुग्णालय लवकरात लवकर सुरू करण्यावर भर दिला.
या बैठकीस आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर, मंत्री दादाजी भूसे, गुलाबराव पाटील, उदय सामंत, शंभूराज देसाई, संजय शिरसाट, संजय राठोड, प्रताप सरनाईक, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, प्रधान सचिव नविन सोना, आरोग्य विभागाचे सचिव ई. रविंद्रन, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार उपस्थित होते.