‘गडचिरोली महोत्सव २०२५’ समाजजागृतीचा सशक्त मंच – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
91
‘गडचिरोली महोत्सव २०२५’ समाजजागृतीचा सशक्त मंच – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
‘गडचिरोली महोत्सव २०२५’ समाजजागृतीचा सशक्त मंच – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘गडचिरोली महोत्सव २०२५’ समाजजागृतीचा सशक्त मंच – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गडचिरोली जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत घडलेल्या सकारात्मक परिवर्तनाची साक्ष देणारा ‘गडचिरोली महोत्सव २०२५’ मोठ्या उत्साहात पार पडत असून, हा महोत्सव जिल्ह्यातील नागरिकांसाठी हक्काचा, अभिव्यक्तीचा आणि सक्रिय सहभागाचा मंच ठरत आहे. गडचिरोली पोलीस दलाने दाखविलेल्या शौर्य, समर्पण आणि कर्तव्यनिष्ठेमुळे आज या जिल्ह्यात भयाचे नव्हे, तर विकासाचे, जनतेचे आणि संविधानाचे राज्य प्रस्थापित झाले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

गडचिरोली पोलीस विभागाच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या ‘गडचिरोली महोत्सव २०२५’ या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे सहपालकमंत्री आशिष जयस्वाल, गृह (ग्रामीण) राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, एकेकाळी नक्षलवादामुळे ओळखला जाणारा गडचिरोली जिल्हा आज शांतता, विश्वास आणि विकासाच्या दिशेने वेगाने पुढे जात आहे. पोलीस दल आणि स्थानिक जनतेतील वाढलेला विश्वास हे या बदलाचे प्रमुख कारण असून, अशा वातावरणात कला, संस्कृती आणि क्रीडेला प्रोत्साहन देणारे उपक्रम समाजाला नवी दिशा देतात.

कला, क्रीडा, लोकप्रबोधन, नृत्य, गायन आणि मनोरंजन यांच्या माध्यमातून समाजजागृती, सांस्कृतिक एकात्मता आणि युवकांना सकारात्मक संधी देण्याचे कार्य गडचिरोली महोत्सवाच्या माध्यमातून साधले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या महोत्सवामुळे स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळत असून, जिल्ह्यातील सुप्त कला-गुणांना नवी ओळख मिळत आहे, असेही त्यांनी नमूद केले.

‘गडचिरोली महोत्सव २०२५’ हा केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नसून, तो सामाजिक परिवर्तनाचा, लोकसहभागाचा आणि आत्मविश्वासाचा उत्सव आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून गडचिरोली जिल्हा आता विकासाच्या नव्या पर्वात प्रवेश करत असल्याचा ठाम विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here