नवी मुंबईत १३,३३६ दुबार मतदारांची नोंद; मतदानासाठी एका ठिकाणाची हमीपत्राद्वारे निवड

0
268
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग विधान परिषद निवडणूक : सहाही उमेदवारांची १२ नामनिर्देशन पत्रे वैध
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग विधान परिषद निवडणूक : सहाही उमेदवारांची १२ नामनिर्देशन पत्रे वैध

नवी मुंबईत १३,३३६ दुबार मतदारांची नोंद; मतदानासाठी एका ठिकाणाची हमीपत्राद्वारे निवड

नवी मुंबई l प्रतिनिधी

नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी दि. १ जुलै २०२५ रोजीची मतदार यादी ग्राह्य धरण्यात आली असून, राज्य निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेल्या संभाव्य दुबार मतदारांच्या यादीची सखोल पडताळणी करण्यात आली आहे. या पडताळणीअंती नवी मुंबई महापालिका क्षेत्रात १३,३३६ दुबार मतदार आढळून आले असून, त्यांनी दोनपैकी कोणत्या एका ठिकाणी मतदान करणार याबाबतचे विकल्प स्वरूपातील हमीपत्र भरून दिले आहे.

राज्य निवडणूक आयोगाकडून प्राप्त झालेल्या ४५,५८८ संभाव्य दुबार मतदारांच्या यादीवर प्रभागनिहाय प्रत्यक्ष तपासणी करण्यासाठी बीएलओ (बूथ लेव्हल ऑफिसर) यांची विशेष पथके स्थापन करण्यात आली होती. महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण प्रक्रिया राबवण्यात आली.

संगणक प्रणालीच्या सहाय्याने मतदारांच्या नावांनुसार व विधानसभा यादी भागांनुसार मतदार यादीचे वर्गीकरण करण्यात आले. छायाचित्रांसह दुबार मतदारांची यादी बीएलओंकडे देण्यात आली होती. त्यानुसार बीएलओंनी प्रत्यक्ष क्षेत्रात जाऊन मतदारांची फोटो पडताळणी, नावातील साम्य, आई-वडिलांची नावे, पत्ता समानता आदी विविध निकषांच्या आधारे तपासणी केली.

या पडताळणीत एकाच व्यक्तीचे नाव दोन वेगवेगळ्या पत्त्यांवर आढळून आल्यास, संबंधित मतदाराकडून कोणत्या प्रभागातील मतदार यादीतून मतदान करणार याबाबतचे विकल्प स्वरूपातील हमीपत्र भरून घेण्यात आले. यामुळे निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यास आणि दुबार मतदानास प्रतिबंध घालण्यास मदत होणार आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेने राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या संभाव्य दुबार मतदारांची पडताळणी नियोजनबद्ध, शिस्तबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण केल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. या कारवाईमुळे येणाऱ्या महापालिका निवडणुकीत मतदार यादी अधिक अचूक आणि विश्वासार्ह ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here