भीमाशंकर मंदिर ९ जानेवारीपासून तीन महिने दर्शनासाठी बंद; महाशिवरात्रीला दर्शन खुले

0
280
भीमाशंकर मंदिर ९ जानेवारीपासून तीन महिने दर्शनासाठी बंद; महाशिवरात्रीला दर्शन खुले
भीमाशंकर मंदिर ९ जानेवारीपासून तीन महिने दर्शनासाठी बंद; महाशिवरात्रीला दर्शन खुले

भीमाशंकर मंदिर ९ जानेवारीपासून तीन महिने दर्शनासाठी बंद; महाशिवरात्रीला दर्शन खुले

पुणे l (जिमाका)

श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरातील सभामंडप व पायरी मार्गाच्या बांधकामासह भाविकांची सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी तसेच विकासकामे नियोजनबद्ध व कालमर्यादेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने, ९ जानेवारी २०२६ पासून पुढील तीन महिन्यांसाठी (महाशिवरात्रीचा कालावधी वगळून) मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान संस्थानने घेतला आहे. भाविकांनी या निर्णयास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूड्डी यांनी केले आहे.

राज्य शासनाने १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष विकास आराखडा मंजूर केला असून, त्यातील अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याची अंमलबजावणी व प्रत्यक्ष बांधकामाच्या काळातील सुरक्षितता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत २३ डिसेंबर रोजी जिल्हा प्रशासन, देवस्थान संस्थानचे विश्वस्त, स्थानिक दुकानदार व भीमाशंकर ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत झालेल्या संयुक्त बैठकीत सर्वानुमते मंदिर ९ जानेवारीपासून तीन महिन्यांसाठी तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, १२ ते १८ फेब्रुवारी २०२६ या महाशिवरात्रीच्या कालावधीत मंदिर दर्शनासाठी खुले राहणार आहे.

सन २०२७ मध्ये नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, तसेच प्रयागराज येथे पार पडलेल्या महाकुंभ २०२५ च्या अनुभवावरून, लाखो भाविक भीमाशंकर येथे दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुंभमेळ्यापूर्वी आवश्यक पायाभूत सुविधा, सभामंडप, सुरक्षित प्रवेश-निर्गमन व्यवस्था आणि गर्दी नियंत्रणाची कामे वेळेत पूर्ण करणे हे प्रशासनाचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. कामाचे स्वरूप व व्याप्ती लक्षात घेता भाविकांची सुरक्षितता राखणे आणि विकासकामे नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करणे आवश्यक असल्याने मंदिर परिसर तात्पुरता बंद ठेवण्यात येणार आहे.

या कालावधीत मंदिर दर्शन बंद असले तरी नित्य पूजाअर्चा, अभिषेक व धार्मिक विधी परंपरेनुसार नियोजित वेळेत सुरू राहणार आहेत. थेट दर्शन सेवा उपलब्ध राहणार नसून, बांधकाम यंत्रणा, अधिकृत अधिकारी-कर्मचारी तसेच भीमाशंकर ग्रामस्थ वगळता कोणालाही मंदिर परिसरात प्रवेश दिला जाणार नाही.

“श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिराचा विकास दीर्घकालीन सुरक्षितता, सुविधा आणि भाविकांच्या सोयीसाठी अत्यंत आवश्यक आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ही कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी मंदिर तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, भाविकांनी व स्थानिक नागरिकांनी देवस्थान संस्थान, जिल्हा प्रशासन, पोलीस व स्थानिक प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे,” असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. डूड्डी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here