‘सांडव ज्वेलर्स’ची यशोगाथा’

0
98
'सांडव ज्वेलर्स'ची यशोगाथा'
'सांडव ज्वेलर्स'ची यशोगाथा'
‘सांडव ज्वेलर्स’ची यशोगाथा’
श्री.धनंजय शेटये*
    गोळवण
 माणुसकीच्या पुण्याईतून फुललेलं सोन्याचं लेणं...
आज मुंबईच्या विशाल महानगरात आणि तिच्या उपनगरात ‘सांडव ज्वेलर्स’ हे केवळ एक दुकान नाही, तर ते विश्वास, सचोटी आणि पितृप्रेमाच्या पुण्याईने सिद्ध झालेला एक दिमाखदार ब्रॅण्ड आहे. या ब्रॅण्डच्या अनेक तेजस्वी शाखा आज तळपताना दिसतात. पण या सुवर्ण-रोपट्याचे बीज ज्यांनी रुजवले, त्या नववी नापास असलेल्या सांडव बंधूंची ही यशोगाथा म्हणजे शून्यातून विश्व उभे करणाऱ्या त्यांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचा आणि पितृप्रेमी निष्ठेचा एक अनोखा अध्याय आहे.
कोकणातील अतिशय दुर्गम, डोंगराळ भूभागावर वसलेल्या भटवाडी-पोईप या लाल मातीच्या गावातून मुंबईच्या चकचकाट्यापर्यंतचा हा प्रवास खडतर संघर्षाची आणि अखंड परिश्रमाची गाथा आहे, जी प्रत्येकाने वाचावी.
शिक्षणापलीकडील यश, संस्कारांची शिदोरी आणि धैर्याचे भांडवल
कधीकधी उच्च शिक्षणाच्या भव्य पदव्यांपेक्षा, तुटपुंज्या जुजबी शिक्षणाच्या सोबतीने असलेले आपले प्रेमळ, मनमिळाऊ बोलणे आणि माणुसकीचे वागणे यशाचे शिखर अधिक वेगाने सर करू शकते. गरज असते ती फक्त अखंड धैर्याची, कामाप्रती प्रचंड मेहनत करण्याची तयारी, निस्सीम प्रामाणिकपणाची आणि स्वतःच्या कर्तृत्वावरील अढळ विश्वासाची! हीच संस्कारांची शिदोरी घेऊन कै. दत्ताराम काशिराम सांडव यांच्या मायेच्या आणि शिस्तीच्या छायेत वाढलेल्या या भावांची कहाणी म्हणजे लाखो तरुणांसाठी एक प्रेरणादायी दीपस्तंभ आहे.
 भटववाडी-पोईप ते मुंबई: खडतर जीवनाचा आरंभ
देऊ दत्ताराम सांडव, काशिराम  दत्ताराम सांडव, सदाशिव सांडव आणि संतोष सांडव ही चार बंधू आणि सोबत दोन बहिणी उषा आणि सरीता, असा हा मोठा परिवार! घरात कमावणारे हात तुलनेने कमी आणि खाणारी मुखे जास्त, अशी परिस्थिती. वडील कै. दत्ताराम काशिराम सांडव आणि माता  कै.सौ. सुमित्रा दत्ताराम सांडव यांनी मोलमजुरी करून संसाराचा गाडा हाकला. पितृछत्र लवकर हरपल्यामुळे कै. दत्ताराम यांनी त्यांच्या चुलत्यांच्या संस्कारात राहून, एकत्र कुटुंब पद्धतीचा धागा शेवटपर्यंत जपला. त्यांचे वडिलोपार्जित काम लाकूड चिरकाम होते.गावोगावी लाकूड चिरकाम करुन ते संसाराचा उदरनिर्वाह करत होते. त्यांची धर्मपत्नी कै.सौ. सुमित्रा दत्ताराम सांडव यांची खंबीर साथ त्यांना लाभली. या हिंमतवान धर्मपत्नीने अनेक संकटांना सामोरे जात, कुटुंबाला प्रेमाचा गारवा दिला. त्या शेतीत राब राब राबल्या. खोल विहिरीवर असलेली  ‘लाट’ ओढून  शेतीला पाणी देऊन शेतमळे पिकवले.खरंतर ‘लाटीने’ पाणी काढणे जिकिरीचे, पुरुषांचे काम पण ते  काम या रणरागिणी मातेने  कौटुंबिक जबाबदारीच्या ओझ्याखाली आपल्या पतीच्या संसारात साथ देण्यासाठी जिद्दीने केले. आपल्या कष्टाच्या बळावर संस्काराचा प्रेमरूपीमळा मेहनतीने फुलविला आणि शेतात सोनं पिकवले आणि ज्यामुळे कुटुंबाला घरचा  भाजीपाला मिळाला आणि कौटुंबिक  खर्चाला हातभार लाभला.
मुंबईची वाट- नववी नापास पण कष्टाने पास!
सर्वात मोठे चिरंजीव देऊ दत्ताराम सांडव. शाळेत जाण्यासाठी ५-६ किलोमीटर घनदाट जंगलातून पायपीट करावी लागे, जिथे हिंस्त्र पशूंचे भय होते. यामुळे देऊ जेमतेम नववीपर्यंत पोहोचले आणि नापास झाले. शिक्षणापेक्षा त्यांनी वडिलांना लाकूड चिरकामात मदत करायला सुरुवात केली. कष्टाला कधीच डगमगले नाहीत. अर्धी मजुरी मिळत असली तरी, प्रचंड मेहनतीचे लाकडाचे ओंडके उचलण्याचे काम त्यांनी कधीही डगमगून न जाता केले.
बालपणापासूनच अठरा विश्व दारिद्र्याच्या चटक्यांनी त्यांच्या जीवनाला कष्टमय जीवनाची सवय लावली होती. पण पितृप्रेमी देऊ कधीही वडिलांची माणुसकी आणि प्रामाणिकपणाची शिकवण विसरले नाहीत. तोच प्रामाणिकपणा हीच त्यांची सर्वात मोठी कमाई ठरली.
एकदा परळ येथील ख्यातनाम ‘श्रद्धा ज्वेलर्स’चे मालक फणसगावकर गावी आले असताना दत्ताराम सांडव यांनी त्यांच्याजवळ धाव घेतली आणि आपल्या मोठ्या मुलाला, देऊला, मुंबईत नोकरी देण्याची विनंती केली. नातेवाईकांच्या आश्रयाला राहून  श्री.देऊ  सांडव हे श्री. फणसगावकर यांच्या सराफा दुकानात ‘जे सांगतील ते’ काम इमानेइतबारे करू लागले.परिस्थितीचे फटके आणि दारिद्र्याचे चटके यामुळे  कोणतेही कष्टाचे काम करताना त्यांना कधी लाज वाटली नाही. कमीपणा वाटला नाही. मेहनत हेच सर्वस्व मानणारे होते.  हळूहळू कारागिरांकडून कला शिकू लागले.
भावंडांची साथ, राम-लक्ष्मणाची जोड!
देऊ यांचे मन आपल्या कुटुंबासाठी तळमळत होते. आपल्या आई-वडिलांना तुटपुंज्या कमाईत मदत करणे त्यांना गरजेचे वाटले. याच विचारातून त्यांनी सर्वात धाकटा भाऊ संतोष सांडव यांना आपल्यासोबत मुंबईत आणले. शाळेत घालण्याचा विचार होता, पण संतोषही नववीत नापास झाले. मग तेही ‘श्रद्धा ज्वेलर्स’मध्ये काम करू लागले. फणसगावकर हे खरंच सहृदयी देवमाणूस ठरले, कारण त्यांनीच या दोन्ही भावांना मुंबईत पहिला आधार दिला.
देऊ, काशिराम, सदा, संतोष हे बंधू म्हणजे जणू रामायणातील राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न याच भावंडांचे आधुनिक रूप! त्यांची ही अखंड एकी आणि गुण्यागोविंदाने नांदणे, याचे एकमेव कारण म्हणजे कै. दत्ताराम सांडव यांच्या संस्कारांची भक्कम बैठक.
‘सांडव ज्वेलर्स’ चा उदय यशाचा सुवर्ण-कलश
नववी नापास असलेल्या देऊ दत्ताराम सांडव यांनी मग मात्र कधीच मागे वळून पाहिले नाही. प्रचंड कष्ट करण्याची तयारी, सत्याचा मार्ग आणि नवनवीन शिकण्याची उमेद यामुळे ते मुंबईसारख्या शहरात आपले स्वतःचे असे भक्कम स्थान निर्माण करू शकले. धाकटे बंधू संतोष सांडव यांनी त्यांना तितकीच मोलाची साथ दिली.
अनेक वर्षे सराफाच्या दुकानात काम करून कला शिकल्यावर, या दोन नववी नापास भावंडांनी स्वतंत्र व्यवसायात उतरण्याचे धाडस केले. भांडुपमध्ये ‘सांडव ज्वेलर्स’ या नावाने त्यांनी आपली पहिली सोन्याची पेढी सुरू केली. हे एक भव्य स्वप्न होते, पण त्यात मोठी जोखीमही होती.
या हिंमतवान सांडव बंधूंनी आपल्या मनमिळाऊ स्वभावाने, प्रेमळ जिव्हाळ्याने आणि माणुसकीच्या राजमंत्राने व्यवसायात पाय रोवले. ‘ग्राहक हेच दैवत’ मानले आणि बघता बघता त्यांच्या व्यवसायाचा उत्कर्ष होऊ लागला.
आज मुंबईसारख्या विशालकाय नगरीत ‘सांडव ज्वेलर्स’ हा एक प्रतिष्ठित ब्रॅण्ड आहे, ज्याच्या भांडुप, डोंबिवली, दिवा अशा ठिकाणी मुंबई शहरात आणि उपनगरात अनेक शाखा आहेत.
विनम्रतेचा वारसा, पाय जमिनीवर, दृष्टी आकाशात
या दोन नववी नापास भावांनी जगाला हे दाखवून दिले की, जर तुमच्याकडे प्रामाणिकपणा, प्रचंड कष्ट करण्याची तयारी, आत्मविश्वास, माधुर्यपूर्ण बोलणं आणि माणसं जोडण्याची कला असेल, तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही.
एवढा मोठा व्याप सांभाळूनही श्री. देऊ दत्ताराम सांडव हे न चुकता दरवर्षी आपल्या मातीशी जोडलेले राहण्यासाठी गावी शेती करण्यासाठी जातात. मोठेपणाचा गर्व नसलेली, पण यशाचे सर्वोच्च शिखर गाठलेले असूनही पाय जमिनीवर असणारी ही तेजस्वी व्यक्तिमत्त्वे म्हणजे खऱ्या अर्थाने सांडव बंधू होत!काशिराम आणि सदानंद सांडव यांनी गावात राहून घर, शेती, परंपरा आणि संस्कृती जपण्याची जबाबदारी समर्थपणे निभावली. सण-उत्सव, कौटुंबिक रितीरिवाज आणि एकत्र कुटुंब पद्धतीची मूल्यं त्यांनी अखंड जपली.आणि कौटुंबिक रितीरिवाजांचे संवर्धन करून या दोन बंधूंनी सांडव परिवारातील एकीची वज्रमूठ कायम ठेवली आहे. तरुण पिढीसाठी धडा ‘सांडव ज्वेलर्स’ची ही कहाणी सांगते की, यश मिळवण्यासाठी केवळ पदव्यांची गरज नसते; तर प्रामाणिकपणा, कठोर परिश्रम आणि भावंडांची एकी असेल, तर शून्यातूनही सुवर्ण साम्राज्य उभं करता येते. मातीशी नातं जपणारा हा ‘विश्वासाचा सुवर्ण प्रवास’ आजच्या पिढीसाठी खऱ्या अर्थाने दीपस्तंभ ठरणारा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here