गणपती सणासाठी चाकरमान्यांनी फुलले कोकण; गावागावात उत्साहाचे वातावरण
गणपती सणासाठी चाकरमान्यांनी फुलले कोकण; गावागावात उत्साहाचे वातावरण
कोकण (प्रतिनिधी) :
गणेशोत्सवासाठी मुंबई, पुणे आणि राज्याच्या विविध भागांतून हजारो चाकरमानी आपल्या गावाकडे परतल्याने कोकणात सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. गणरायाच्या आगमनासाठी घराघरांत जय्यत तयारी सुरू असून, गावागावातील बाजारपेठा, रस्ते आणि वाड्या चाकरमान्यांच्या उपस्थितीने गजबजून गेल्या आहेत.
गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे, एसटी, खासगी वाहने तसेच अन्य प्रवासी साधनांनी चाकरमानी मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. अनेक गावांमध्ये मुंबईहून येणाऱ्या गणेशभक्तांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. ढोल-ताशे, तुतारी, रांगोळी आणि पुष्पवृष्टीने काही ठिकाणी चाकरमान्यांचे स्वागत करण्यात आल्याने गणेशोत्सवाचा उत्साह आणखी द्विगुणित झाला आहे.
गणेशोत्सव हा कोकणवासीयांच्या जिव्हाळ्याचा सण असल्याने वर्षभर नोकरी-व्यवसायानिमित्त मुंबई, पुणे आदी शहरांमध्ये राहणारे नागरिक आवर्जून गावी येतात. त्यामुळे पुढील काही दिवस कोकणातील गावांमध्ये घराघरांत गणरायाची आरती, भजन, फुगड्या आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार आहे. चाकरमान्यांच्या आगमनामुळे कोकणातील बाजारपेठांनाही मोठी चैतन्याची झळाळी आली असून, ‘गणपतीसाठी चाकरमान्यांनी फुलले कोकण’ असे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.