१२ ते २५ सप्टेंबरदरम्यान अवजड वाहनांना प्रवेशबंदी; पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन
कणकवली :
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कणकवली शहर व परिसरातील वाहतूक सुरळीत राहावी, वाहतूक कोंडी तसेच अपघात टाळता यावेत आणि नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी सिंधुदुर्ग पोलिसांकडून शहरातील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.
गणेशोत्सव १४ सप्टेंबर २०२६ पासून सुरू होत असून या काळात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भाविक व नागरिकांची वाहनांमधून ये-जा होण्याची शक्यता आहे. तसेच कणकवली शहरातील बाजारपेठांमध्ये गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन हे वाहतूक नियोजन करण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम ३४ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून १२ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजल्यापासून २५ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत हे वाहतूक बदल लागू केले आहेत.
अवजड वाहनांना प्रवेशबंदी : पटवर्धन चौक, कणकवली येथून कलमठमार्गे आचरा जाणारी तसेच आचरा-कलमठ मार्गे कणकवलीकडे येणारी अवजड वाहने पूर्णपणे बंद करण्यात आली आहेत.
हलक्या वाहनांसाठी एकेरी मार्ग : पटवर्धन चौक ते लक्ष्मी चित्रमंदिर या मार्गावरून कलमठमार्गे आचरा जाण्यासाठी तसेच कलमठमार्गे कणकवली बाजारपेठेकडे येण्यासाठी एकेरी वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे.
पर्यायी मार्ग : हलकी व इतर वाहने लक्ष्मी चित्रमंदिर–किनई रोड–गांगोमंदिर मार्गे कणकवली बाजारपेठ रोड या पर्यायी मार्गाचा वापर करू शकतात.
अत्यावश्यक सेवांना सूट : पोलीस वाहने, अग्निशमन दलाची वाहने, रुग्णवाहिका तसेच इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना या वाहतूक बदलातून सूट देण्यात आली आहे.
गणेशोत्सव काळात वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी केले आहे.