गणेशोत्सवासाठी येणाऱ्या जिल्हावासीयांची लूट खपवून घेतली जाणार नाही!

0
19
गणेशोत्सवासाठी येणाऱ्या जिल्हावासीयांची लूट खपवून घेतली जाणार नाही!
गणेशोत्सवासाठी येणाऱ्या जिल्हावासीयांची लूट खपवून घेतली जाणार नाही!

गणेशोत्सवासाठी येणाऱ्या जिल्हावासीयांची लूट खपवून घेतली जाणार नाही!

रिक्षांच्या जादा भाड्यावर आरटीओचे नियंत्रण; जादा भाडे आकारणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे निर्देश

रत्नागिरी :
गणेशोत्सवासाठी मुंबई-पुणे तसेच अन्य भागांतून रेल्वेने रत्नागिरी जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांकडून काही रिक्षाचालकांकडून अवाजवी भाडे आकारले जात असल्याच्या तक्रारींची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. गणेशोत्सवासाठी येणाऱ्या जिल्हावासीयांची लूट खपवून घेतली जाणार नाही, असे स्पष्ट करत जादा भाडे आकारणाऱ्या रिक्षाचालकांवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहावी, यासाठी जिल्हा शांतता समितीची बैठक जिल्हाधिकारी तथा शांतता समितीचे अध्यक्ष मनुज जिंदल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पार पडली. यावेळी रिक्षा भाड्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाने विशेष दक्षता घेऊन जादा भाडे आकारणाऱ्यांवर कारवाई करावी, अशा सूचना देण्यात आल्या.
यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदही रानडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, सहायक पोलीस अधीक्षक आरांक्षा यादव, मुख्याधिकारी वैभव गारवे आदी प्रत्यक्ष उपस्थित होते. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठकीला उपस्थित होते.
वाहतूक आणि अतिक्रमणावरही लक्ष
गणेशोत्सव काळात शहरातील वाहतूक सुरळीत राहावी यासाठी रस्त्यांवर मोकाट गुरांचा त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. शहरातील फुटपाथ मोकळे करणे, पकडण्यात आलेल्या जनावरांच्या संवर्धनासाठी योग्य नियोजन करणे तसेच जड-अवजड वाहनांच्या वाहतुकीबाबत आवश्यक नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले.
‘नो पार्किंग’ तसेच वाहतुकीसाठी आवश्यक असलेले इतर मार्गदर्शक फलक नागरिकांना स्पष्टपणे दिसतील अशा ठिकाणी लावण्याच्या सूचनाही प्रशासनाला देण्यात आल्या.
रामनाका-विठ्ठल मंदिर रस्ता मोकळा करण्याचे आदेश
रामनाका ते विठ्ठल मंदिर या मार्गावर फळविक्रेत्यांनी गाड्या लावून केलेले अतिक्रमण आणि दुचाकींच्या बेवारस पार्किंगमुळे पादचारी तसेच ग्राहकांना होणारा त्रास लक्षात घेऊन हा रस्ता तातडीने मोकळा करण्याचे आदेश देण्यात आले.
विसर्जनस्थळी वीज, प्रकाशयोजना आणि सुरक्षा
गणेशोत्सव काळात वीजपुरवठा सुरळीत राहावा यासाठी महावितरणने पूर्ण दक्षता घ्यावी, असे निर्देश देण्यात आले. गणेशमूर्ती विसर्जनाच्या ठिकाणी पुरेशी प्रकाशयोजना, सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक तसेच आपत्कालीन परिस्थितीत बोटींची सुविधा उपलब्ध ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.
विसर्जनाचे मार्ग आधीच निश्चित करून त्यानुसार आवश्यक नियोजन करण्याचे आदेशही प्रशासनाला देण्यात आले आहेत.
शांतता समितीच्या सदस्यांसाठी स्वतंत्र व्हॉट्सॲप ग्रुप
शांतता समितीच्या सदस्यांशी प्रशासनाचा अधिक चांगला समन्वय राहावा, यासाठी सदस्यांना अधिकृत ओळखपत्रे देण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली. तसेच आपत्कालीन परिस्थितीतील तसेच आवश्यक माहितीची जलद देवाणघेवाण व्हावी यासाठी शांतता समितीचा स्वतंत्र व्हॉट्सॲप ग्रुप तयार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
गणेशोत्सव काळात नागरिक, भाविक आणि चाकरमान्यांना सुरक्षित व सुरळीत वातावरण मिळावे, यासाठी विविध विभागांनी परस्पर समन्वयाने काम करण्याचे आवाहनही बैठकीत करण्यात आले. बैठकीला विविध विभागांचे अधिकारी तसेच जिल्हा शांतता समितीचे शासकीय व अशासकीय सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here