रामराजेची रानभाजी… चवीसोबत आरोग्याची हमी!

0
24
रामराजेची रानभाजी… चवीसोबत आरोग्याची हमी!
रामराजेची रानभाजी… चवीसोबत आरोग्याची हमी!

रामराजेची रानभाजी… चवीसोबत आरोग्याची हमी!

‘रानमाया २०२६’मध्ये ४५ हून अधिक रानभाज्यांपासून साकारले नावीन्यपूर्ण खाद्यपदार्थ; दापोलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

दापोली प्रतिनिधी : अरविंद मांडवकर
दापोली : कोकणच्या समृद्ध निसर्गपरंपरेचा अविभाज्य भाग असलेल्या रानभाज्यांचे पौष्टिक महत्त्व आणि त्यापासून तयार होणाऱ्या नावीन्यपूर्ण खाद्यपदार्थांची ओळख सर्वसामान्यांना करून देण्याच्या उद्देशाने रामराजे महाविद्यालयात ‘रानमाया २०२६’ या अनोख्या रानभाजी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. गेल्या अकरा वर्षांपासून सातत्याने आयोजित होणाऱ्या या उपक्रमाला यंदाही दापोलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
‘नाणीचो वाडो’ कृषी पर्यटन, कुडाळ, सिंधुदुर्गचे संस्थापक स्मितेश तांबे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी दापोली तालुका कृषी अधिकारी हेमंत ठोंबरे, रामराजे महाविद्यालयाचे संस्थापक डॉ. संदीप राजपुरे, जिल्हा परिषद सदस्य किशोरभाई देसाई, मनसे जिल्हा सचिव सचिन गायकवाड, पंचायत समिती सदस्य निलेश शेठ, उपसभापती नम्रता तोडणकर, संस्थेच्या अध्यक्षा स्मिताली राजपुरे, प्राचार्य डॉ. अशोक निर्बाण, स्थानिक व्यवस्थापन समितीचे डॉ. दीपक हर्डीकर, आर. व्ही. बेलोसे एज्युकेशन फाउंडेशनचे चेअरमन धनंजय यादव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
प्रदर्शनाला जेसीआय दापोलीचे अध्यक्ष जेसी डॉ. कुणाल मेहता, रोटरी क्लबचे अध्यक्ष रो. संदीप बागायतकर, रोटरी व लायन्स क्लबचे सदस्य, जेसी सदस्य, पत्रकार, नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी रानभाज्यांपासून तयार करण्यात आलेल्या विविध पदार्थांचा मनसोक्त आस्वाद घेतला.

४५ हून अधिक रानभाज्यांपासून भन्नाट पदार्थ!

‘रानमाया २०२६’चे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे ४५ हून अधिक रानभाज्यांपासून तयार करण्यात आलेले विविध नावीन्यपूर्ण खाद्यपदार्थ. भारंगी, टाकळा, कुरडू, कारटोली, चिचाडी, मायाळू, रताळ्याची पाने, प्याव, दार, कुड्याच्या शेंगा, शतावरी, थरबरा यांसह कोकणातील विविध रानभाज्यांचा यामध्ये समावेश होता.
पारंपरिक पद्धतीने वापरल्या जाणाऱ्या या रानभाज्यांना आधुनिक पाककलेची जोड देत विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पदार्थांनी उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
‘रानातून थेट ताटात’चा अनोखा अनुभव
रानभाज्यांमध्ये असलेले नैसर्गिक पोषक घटक, त्यांचे आरोग्यदायी महत्त्व आणि स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या या नैसर्गिक संपत्तीचा खाद्यपदार्थांमध्ये होणारा उपयोग याबाबत प्रदर्शनातून प्रभावी जनजागृती करण्यात आली.
‘रानातून थेट ताटात’ या संकल्पनेतून कोकणच्या मातीतला अस्सल रानमेवा आधुनिक खाद्यसंस्कृतीशी जोडण्याचा महाविद्यालयाचा प्रयत्न या उपक्रमातून प्रकर्षाने दिसून आला.
गेल्या अकरा वर्षांपासून रानभाज्यांचे प्रदर्शन आयोजित करून कोकणची पारंपरिक खाद्यसंस्कृती, स्थानिक जैवविविधता आणि निसर्गाशी असलेले नाते पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य रामराजे महाविद्यालय करत आहे. या उपक्रमाचे उपस्थित नागरिकांनी कौतुक करत सहभागी विद्यार्थी, आयोजक आणि महाविद्यालयाचे अभिनंदन केले.
रानभाज्यांपासून तयार केलेल्या नावीन्यपूर्ण पदार्थांना मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता कोकणचा हा ‘रानमेवा’ आता जंगल आणि डोंगरदऱ्यांपुरता मर्यादित न राहता आधुनिक खाद्यसंस्कृतीतही आपले स्थान निर्माण करत आहे, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.
‘ रामराजेची रानभाजी… चवीसोबत आरोग्याची हमी!’ या घोषवाक्याला साजेसे ठरलेले ‘रानमाया २०२६’ हे प्रदर्शन म्हणजे पारंपरिक कोकणी खाद्यसंस्कृती, स्थानिक जैवविविधता आणि आधुनिक पाककलेचा सुंदर संगम ठरले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here