पर्यावरण संवर्धनाचा संदेश केवळ जनजागृतीपुरता मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष कृतीतून देत जेसीआय दापोलीने ‘सस्टेनेबल सोल्युशन्स’ प्रकल्पांतर्गत ‘प्लास्टिक फ्री दापोली’ या संकल्पनेच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दापोली एस.टी. बसस्थानक तसेच बाजारपेठ परिसरातील फळविक्रेते, भाजीविक्रेते आणि अन्य छोट्या व्यावसायिकांना १८०० हून अधिक कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.
जेसीआय दापोलीचे अध्यक्ष जेएफएम डॉ. कुणाल मेहता यांनी जानेवारी २०२६ मध्ये पदग्रहण सोहळ्याच्या दिवशी वर्षभरासाठी ‘प्लास्टिक फ्री दापोली’ ही संकल्पना जाहीर केली होती. त्यानुसार वर्षभर विविध उपक्रमांच्या माध्यमातून प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी जनजागृतीसोबतच प्रत्यक्ष कृतीवर भर देण्यात येत आहे.
या अभियानातील पहिल्या उपक्रमांतर्गत दापोली पोस्ट ऑफिस, एमएसईबी कार्यालय, विविध ऑटोरिक्षा चालक तसेच नुकतेच दातार वृद्धाश्रम येथे १५० हून अधिक स्टील बॉटल्सचे वाटप करण्यात आले. ‘प्लास्टिकच्या बाटलीऐवजी स्टीलच्या बाटलीचा वापर’ हा पर्यावरणपूरक पर्याय नागरिकांपर्यंत पोहोचविणे हा या उपक्रमाचा उद्देश होता.
यासोबतच मागील सात-आठ महिन्यांत जेसीआय दापोलीने विविध स्वच्छता अभियानांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला. पंचायत समिती दापोलीच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमांसह दापोलीतील विविध समुद्रकिनाऱ्यांवर बीच क्लीनिंग अॅक्टिव्हिटी राबवून संस्थेने पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. या कार्याची दखल घेत जेसीआय इंडियाच्या झोन ११ कडूनही जेसीआय दापोलीच्या कार्याचे कौतुक करण्यात आले.
गणेशोत्सवाच्या काळात बाजारपेठेत खरेदी-विक्री वाढत असल्याने प्लास्टिक पिशव्यांचा वापरही मोठ्या प्रमाणात होतो. ही बाब लक्षात घेऊन प्लास्टिक पिशव्यांना पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी कापडी पिशव्यांचे व्यापक वितरण करण्यात आले. ‘प्लास्टिकला नकार, कापडी पिशवीचा स्वीकार’ हा संदेश या उपक्रमातून नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला.
या उपक्रमासाठी जेसीआय दापोलीचे अध्यक्ष जेएफएम डॉ. कुणाल मेहता, सचिव जेसी रोशन वेदक तसेच सदस्य जेएफडी कुणाल मंडलीक, जेसी भूषण इस्वलकर, जेएफएम तेजस मेहता, जेसी एचजीएफ ऋषिकेश शेठ, जेसी एचजीएफ मयुरेश शेठ, जेसी प्रसाद दाभोळे, जेसी एचजीएफ अद्नान मुकादम, जेसी रोहन आंब्रे, जेसी ऋषिकेश तलाठी आणि जेसी एचजीएफ विनय शिगवण उपस्थित होते.
जेसीआय दापोलीच्या या पर्यावरणपूरक उपक्रमाचे नागरिक, छोटे व्यावसायिक आणि विविध स्तरांतून कौतुक होत आहे. ‘प्लास्टिक फ्री दापोली’ या संकल्पनेला केवळ घोषणेपुरते न ठेवता जनजागृतीसोबत प्रत्यक्ष कृतीची जोड देत जेसीआय दापोलीने पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने आदर्श पाऊल उचलले आहे