गरजू गरोदर महिलांसाठी ‘गरीब’ योजनेअंतर्गत विनामूल्य सोनोग्राफी व तपासणी सेवा सुरू
पालघर l
आदिवासी भागातील गर्भवती महिलांना आरोग्यसेवा अधिक सुलभ करण्यासाठी आदिवासी एकता मित्र मंडळ, बिरसायत भवन, मनोर (ता. व जिल्हा पालघर) यांच्या वतीने ‘गरीब – गरजू गरोदर महिलांसाठी विनामूल्य सोनोग्राफी व तपासणी सेवा योजना’ सुरू करण्यात आली आहे. आर्थिक अडचणींमुळे वेळेवर तपासणी न करणाऱ्या महिलांसाठी ही योजना मोठा दिलासा ठरणार आहे.
संस्थेच्या माहितीनुसार, या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या गरीब आणि गरजू गर्भवती महिलांनी पत्रात नमूद केलेली आवश्यक कागदपत्रे घेऊन बिरसायत भवन, मनोर येथे संपर्क साधावा व संबंधित फॉर्म भरावा.
फॉर्म भरल्यानंतर लाभार्थी महिलांना विशाल सोनोग्राफी सेंटर, मनोर येथे विनामूल्य सोनोग्राफीची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच, आवश्यकता भासल्यास आस्था हॉस्पिटल, मनोर येथे विविध तपासण्यांसाठीही विनामूल्य सेवा मिळणार आहे.
बिरसायत परिवार आणि आदिवासी एकता मित्र मंडळाने ही योजना सुरू करताना सांगितले की, ग्रामीण आणि आदिवासी भागातील अनेक गरोदर महिलांना आर्थिक मर्यादांमुळे तातडीच्या आणि आवश्यक तपासण्या करता येत नाहीत. मातामुलांचे आरोग्य जपण्यासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची ठरेल.
स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत संस्थेचे आभार मानले असून, अधिकाधिक महिलांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


