‘गाव तिथे उद्योजक’ मोहिमेतून ग्रामीण महाराष्ट्रात आर्थिक क्रांती: MACCIA चा संकल्प

0
22
'गाव तिथे उद्योजक' मोहिमेतून ग्रामीण महाराष्ट्रात आर्थिक क्रांती: MACCIA चा संकल्प
'गाव तिथे उद्योजक' मोहिमेतून ग्रामीण महाराष्ट्रात आर्थिक क्रांती: MACCIA चा संकल्प

‘गाव तिथे उद्योजक’ मोहिमेतून ग्रामीण महाराष्ट्रात आर्थिक क्रांती: MACCIA चा संकल्प

३६,००० उद्योजक, १.४४ लाख रोजगार निर्मितीचे २०३१ पर्यंतचे उद्दिष्ट

कोल्हापूर, ६ जुलै:
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड एग्रिकल्चर (MACCIA) ने राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी ‘गाव तिथे उद्योजक’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा अधिकृत शुभारंभ केला आहे. कोल्हापूर येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पार पडलेल्या भव्य पदग्रहण समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पश्चिम महाराष्ट्राचे सुपुत्र रवींद्र माणगावे यांनी २०२६-२०२८ या कार्यकाळासाठी MACCIA च्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली.२०२६ ते २०३१ या कालावधीत राबवल्या जाणाऱ्या या मोहिमेअंतर्गत महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये ३६,००० ग्रामीण सूक्ष्म उद्योजक तयार करण्याचे ध्येय आहे. यामुळे १.४४ लाखांहून अधिक स्थानिक रोजगार संधी निर्माण होतील आणि उपक्रमाच्या तिसऱ्या वर्षापर्यंत अंदाजे ₹३,६०० कोटींची वार्षिक आर्थिक उलाढाल अपेक्षित आहे. याशिवाय, समुदाय-केंद्रित विकासासाठी ३०० सामाजिक उद्योजक घडवण्याची MACCIA ची योजना आहे.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्राला एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याच्या उद्दिष्टाकडे वाटचाल करण्यासाठी शासन MACCIA च्या या संकल्पनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. ग्रामीण भागातून उद्योजक घडले तरच खऱ्या अर्थाने विकास होईल.”
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले की, “संस्थात्मक सहाय्य देण्यासाठी राज्याचा उद्योग विभाग लवकरच MACCIA सोबत सामंजस्य करार करणार आहे. शिवाय, औद्योगिक आणि व्यावसायिक तक्रारींचे थेट व जलद निवारण करण्यासाठी शासन आणि चेंबर संयुक्तपणे ‘उद्योजक जनता दरबार’ हे फास्ट-ट्रॅक व्यासपीठ सुरू करणार आहेत.”
नवीन अध्यक्षांचा संकल्प:
MACCIA चे नवनिर्वाचित अध्यक्ष रवींद्र माणगावे यांनी सांगितले की, “हा उपक्रम ग्रामीण तरुण, महिला, शेतकरी आणि स्वयंसहाय्यता गटांना सर्वसमावेशक प्रशिक्षण, तंत्रज्ञान, आर्थिक सहाय्य आणि सरकारी कल्याणकारी योजनांशी जोडून सक्षम करेल. यातून ‘नोकरी शोधणाऱ्यांचे रूपांतर नोकरी देणाऱ्यांमध्ये’ होईल.”
या कार्यक्रमाला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, विधानपरिषद सदस्य प्रवीण दरेकर, आमदार राहुल आवाडे, राजेंद्र पाटील यड्रावकर, बाबुराव कदम कोहळीकर, सत्यजित देशमुख, ट्रस्ट बोर्डाचे अध्यक्ष आशिष पेडणेकर, मावळते अध्यक्ष संतोष मंडलेचा, ज्येष्ठ उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी यांच्यासह MACCIA चे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here