8 जुलै रोजी विशेष कार्यक्रम: साहित्यिक वैशाली पंडित करणार मार्गदर्शन
मसुरे, 6 जुलै:
मसुरा एज्युकेशन सोसायटी, मुंबई आणि स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा केंद्र, विलेपार्ले यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 8 जुलै 2026 रोजी दुपारी 3 वाजता आर.पी. बागवे हायस्कूल, मसुरे-मर्डे येथील सभागृहात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या ‘मार्सेलीस पराक्रम स्मरण दिना’निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. 8 जुलै 1910 रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी फ्रान्समधील मार्सेलीस बंदरात ब्रिटिशांच्या ताब्यात असलेल्या एस.एस. मोरिया या जहाजाच्या शौचालयाच्या खिडकीतून अथांग समुद्रात उडी मारून इंग्रजांच्या हातावर तुरी दिली. धैर्य, राष्ट्रभक्ती आणि स्वातंत्र्यप्रेमाचा हा अभूतपूर्व आदर्श जगासमोर ठेवला. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील या सुवर्णक्षणाचे स्मरण व्हावे आणि आजच्या विद्यार्थ्यांना त्यातून राष्ट्रप्रेम, धैर्य व प्रेरणा मिळावी, या उदात्त उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात मालवणच्या प्रसिद्ध साहित्यिक सौ. वैशाली पंडित या प्रमुख वक्त्या म्हणून ‘मार्सेलीस पराक्रमाचे ऐतिहासिक महत्त्व, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जीवनकार्य आणि राष्ट्रनिर्मितीतील त्यांचे अमूल्य योगदान’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
या वेळी मसुरे एज्युकेशन सोसायटी, मुंबईचे अध्यक्ष तथा प्रसिद्ध उद्योजक डॉ. दीपक परब, संस्थेचे सचिव प्रसाद बागवे, मुंबई कमिटीचे उपाध्यक्ष उत्तम राणे, लोकल कमिटी अध्यक्ष राजन परब, बागवे हायस्कूल शाळा समिती अध्यक्ष सरोज परब, भरतगड देऊळवाडा हायस्कूल नं. 2 चे शाळा समिती अध्यक्ष बागवे, बागवे हायस्कूलच्या प्रभारी मुख्याध्यापिका सौ. मसुरेकर मॅडम, भरतगड हायस्कूल नं. 2 चे प्रभारी मुख्याध्यापक कांबळे सर, सर्व कमिटी सदस्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
विद्यार्थी, पालक, शिक्षक, संस्थेचे पदाधिकारी, माजी विद्यार्थी तसेच सर्व नागरिकांनी या प्रेरणादायी कार्यक्रमास आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन बागवे हायस्कूलच्या प्रभारी मुख्याध्यापिका सौ. मसुरेकर मॅडम आणि सर्व शिक्षक वर्ग यांनी केले आहे.