गोव्याच्या अधिकाऱ्यांना महाराष्ट्रात ड्रोनचे धडे
पुणे l प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या ‘अमृत’ संस्थेच्या कार्याची दखल आता थेट शेजारील गोवा सरकारने घेतली आहे. अत्याधुनिक व दर्जेदार ड्रोन प्रशिक्षण देणारी संस्था म्हणून ओळख निर्माण केलेल्या ‘अमृत’कडे गोवा सरकारने आपल्या अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण सोपवले आहे. यानुसार गोवा सरकारच्या ३० अधिकाऱ्यांना महाराष्ट्रात ‘अमृत’ संस्थेमार्फत ड्रोन प्रशिक्षण दिले जाणार आहे.
‘अमृत’ (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी) ही पुणे मुख्यालय असलेली एक स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील तरुणांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी ती कार्यरत आहे. कौशल्य विकास आणि रोजगारनिर्मिती हा संस्थेचा मुख्य उद्देश असून, त्याचाच एक महत्त्वाचा भाग म्हणून ‘अमृत ड्रोन मिशन’ राबवले जाते.
‘अमृत’तर्फे दिले जाणारे ड्रोन प्रशिक्षण अत्यंत उच्च दर्जाचे आणि व्यावहारिक असल्याने त्याला मोठी मागणी आहे. या प्रशिक्षणामध्ये ड्रोन उड्डाण, तांत्रिक हाताळणी, सुरक्षा नियम, तसेच विविध क्षेत्रांतील प्रत्यक्ष वापर यांचा समावेश असतो.
विशेष बाब म्हणजे गरजू आणि पात्र विद्यार्थ्यांसाठी हे संपूर्ण प्रशिक्षण पूर्णपणे मोफत दिले जाते. आतापर्यंत १०० हून अधिक युवक-युवतींनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला असून, अनेकांना शेती फवारणी, जमिनीची मोजणी, सरकारी पाहणी, व्हिडिओग्राफी तसेच खासगी क्षेत्रात चांगल्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. सध्या ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर विविध शासकीय व खाजगी कामांमध्ये झपाट्याने वाढत असून, कुशल मनुष्यबळाची मोठी गरज निर्माण झाली आहे.
याच पार्श्वभूमीवर ‘अमृत’ संस्थेच्या अनुभवाची आणि प्रशिक्षणाच्या गुणवत्तेची दखल घेत गोवा सरकारच्या नियोजन व सांख्यिकी विभागाने त्यांच्या ३० अधिकाऱ्यांना येथे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात गोव्याचे संचालक विजय सक्सेना यांनी ‘अमृत’ संस्थेला अधिकृत पत्र पाठवून प्रस्तावास मान्यता दिली आहे, अशी माहिती ‘अमृत’चे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी दिली.
महाराष्ट्रातील अधिकाधिक तरुणांनी ‘अमृत’ संस्थेच्या या ड्रोन प्रशिक्षणाचा लाभ घेऊन आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपले करिअर घडवावे, असे आवाहनही श्री. जोशी यांनी यावेळी केले आहे.


