‘गो कृपा अमृतम्’ ठरतेय सेंद्रिय शेतीचा खरा साथीदार

0
50
'गो कृपा अमृतम्' ठरतेय सेंद्रिय शेतीचा खरा साथीदार
'गो कृपा अमृतम्' ठरतेय सेंद्रिय शेतीचा खरा साथीदार

‘गो कृपा अमृतम्’ ठरतेय सेंद्रिय शेतीचा खरा साथीदार

कमी खर्चात सुपीक माती आणि भरघोस उत्पादनाचा मार्ग

रत्नागिरी, दि. ४ : रासायनिक खतांच्या वाढत्या वापरामुळे जमिनीची सुपीकता कमी होत असताना सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी ‘गो कृपा अमृतम्’ हे जैविक द्रावण प्रभावी पर्याय म्हणून पुढे येत आहे. कमी खर्चात, सहज उपलब्ध साहित्य वापरून तयार होणारे हे द्रावण जमिनीचा कस वाढविण्यास, पिकांची रोगप्रतिकारक क्षमता मजबूत करण्यास आणि उत्पादनाचा दर्जा सुधारण्यास उपयुक्त ठरत असल्याची माहिती चिपळूण तालुका कृषी अधिकारी शत्रुघ्न म्हेत्रे यांनी दिली.
२०० लिटर गो कृपा अमृतम् तयार करण्यासाठी २०० लिटर स्वच्छ पाणी, २ किलो नैसर्गिक देशी गूळ, १ लिटर गो कृपा अमृतम् बॅक्टेरियल कल्चर आणि देशी गायीच्या दुधापासून तयार केलेले २ लिटर ताजे ताक आवश्यक असते. हे मिश्रण प्लास्टिकच्या ड्रममध्ये तयार करून सुती कापडाने झाकावे आणि सावलीत सात दिवस ठेवावे. दररोज एक ते दोन मिनिटे लाकडी काठीने ढवळल्यास सात दिवसांत द्रावण वापरासाठी तयार होते.
कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले की, तयार झालेले कल्चर सातत्याने वाढविता येते. द्रावण कमी झाल्यानंतर त्यात पुन्हा गूळ, ताक आणि पाणी मिसळून नवीन कल्चर तयार करता येते. त्यामुळे हे द्रावण दीर्घकाळ वापरणे शक्य होते.
द्रावण तयार करताना लोखंडी किंवा धातूची भांडी वापरू नयेत. फक्त स्वच्छ प्लास्टिक ड्रमचा वापर करावा. ड्रम थेट उन्हात न ठेवता सावलीत ठेवावा. तसेच पावसाचे किंवा रसायनमिश्रित पाणी द्रावणात जाऊ देऊ नये. द्रावणाचा रंग बदलणे, सौम्य वास येणे किंवा हलका फेस येणे ही नैसर्गिक प्रक्रिया असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
गो कृपा अमृतम् चे प्रमुख फायदे :
  • जमिनीतील सेंद्रिय कर्ब आणि सुपीकता वाढण्यास मदत.
  • पिकांची रोगप्रतिकारक क्षमता वाढून कीड व रोगांचा प्रादुर्भाव कमी होण्यास सहाय्य.
  • रासायनिक खतांवरील खर्चात बचत.
  • पिकांचा दर्जा आणि उत्पादनक्षमता सुधारण्यास मदत.
  • पर्यावरणपूरक आणि शाश्वत शेतीला चालना.
याबाबत जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत कुसुम आनंदराव सातपुते यांनी शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचा स्वीकार करण्याचे आवाहन केले आहे. “शेती म्हणजे केवळ पीक घेणे नव्हे, तर मातीची सेवा करणे होय. रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करून विषमुक्त आणि शाश्वत शेतीकडे वाटचाल करण्याची हीच योग्य वेळ आहे. ‘माती जिवंत, तर शेतकरी श्रीमंत’ हा विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी गो कृपा अमृतम् प्रभावी ठरू शकते,” असे त्यांनी म्हटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here