राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजना,
‘राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार सन्मान योजने’साठी १ ते ३१ जुलैदरम्यान अर्ज
पात्र कलाकारांना दरमहा ₹५ हजार मानधन
मुंबई, दि. ४ : कला आणि साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार सन्मान योजने’ अंतर्गत पात्र लाभार्थ्यांकडून १ ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र लाभार्थ्यांना दरमहा ₹५,००० मानधन देण्यात येणार असून, योजनेचा लाभ राज्यातील १०० ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांना दिला जाणार आहे.
मुंबई शहरचे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवनंदा लंगडापुरे यांनी पात्र लाभार्थ्यांनी ‘आपले सरकार’ पोर्टलवर निर्धारित कालावधीत ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.
योजनेसाठी अर्जदाराचे वय ५० वर्षांपेक्षा अधिक असणे आवश्यक असून, दिव्यांग कलाकारांसाठी वयोमर्यादेत १० वर्षांची शिथिलता देण्यात आली आहे. तसेच कला किंवा साहित्य क्षेत्रात किमान १५ वर्षांचे योगदान असणे आवश्यक आहे. वयोवृद्ध, विधवा, परित्यक्ता आणि दिव्यांग कलाकारांना प्राधान्य दिले जाणार आहे.
याशिवाय, अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न ₹६० हजारांपेक्षा अधिक नसावे. उपजीविका प्रामुख्याने कलेवर अवलंबून असलेल्या आणि इतर कोणत्याही माध्यमातून नियमित उत्पन्न नसलेल्या कलाकारांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच अर्जदार केंद्र किंवा राज्य शासनाच्या कोणत्याही नियमित मासिक पेन्शन अथवा महामंडळाच्या तत्सम योजनेचा लाभार्थी नसावा. महाराष्ट्राचा रहिवासी असणेही बंधनकारक आहे.
अर्जासोबत वयाचा पुरावा, आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, प्रतिज्ञापत्र, बँक पासबुक, पती-पत्नीचा संयुक्त फोटो (लागू असल्यास), दिव्यांगत्व प्रमाणपत्र (लागू असल्यास), राज्य अथवा केंद्र शासनाचे प्रमाणपत्र (लागू असल्यास), तसेच नामांकित संस्था किंवा व्यक्तींची शिफारसपत्रे आणि इतर आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
पात्र साहित्यिक आणि कलाकारांनी अंतिम मुदतीपूर्वी अर्ज सादर करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.