दि. बा. पाटील नामकरणासाठीचे रश्मिता पोपेटा यांचे आमरण उपोषण मागे
दि. बा. पाटील नामकरणासाठीचे रश्मिता पोपेटा यांचे आमरण उपोषण मागे
८ जुलैचा विधानभवन मोर्चा कायम
नवी मुंबई, दि. ४ : दि. बा. पाटील यांच्या नामकरणाच्या मागणीसाठी सुरू असलेले रश्मिता पोपेटा यांचे आमरण उपोषण अखेर मागे घेण्यात आले. आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत रश्मिता पोपेटा यांनी आपल्या आईच्या हस्ते पाणी पिऊन उपोषणाची सांगता केली.
उपोषण मागे घेण्यात आले असले तरी दि. बा. पाटील यांच्या नावासाठीचा संघर्ष सुरूच राहणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले. या मागणीसाठी ८ जुलै रोजी मुंबईतील विधानभवनावर नियोजित मोर्चा पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार काढण्यात येणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली.
आंदोलनकर्त्यांनी नामकरणाच्या मागणीबाबत शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करत संघर्ष पुढेही सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
उपोषणस्थळी आंदोलनकर्ते, समर्थक आणि विविध मान्यवर उपस्थित होते.